फेसबुकवर ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावणार्‍या विरोधात गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- फेसबुकवर ख्रिस्ती धर्मिय व बायबल या धर्मग्रंथाविषयी आक्षेपार्ह लिखाण करुन धार्मिक भावना दुखावणार्‍या समाजकंटकाला अटक करण्याची मागणी शहरातील ख्रिस्ती समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली. ख्रिस्ती समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे निवेदन दिले तर तोफखाना व कोतवाली पोलिस स्टेशनला या अज्ञात समाजकंटका विरोधात गुन्हा दाखल केला. 
Loading...

रविवार सकाळ पासून फेसबुकवरील मराठी बायबल या ग्रुपवर ख्रिस्ती धर्मिय व बायबल या धर्मग्रंथाबद्दल आक्षेपार्ह असे मेसेज पाठविण्याचे सत्र चालू होते. यामुळे समस्त ख्रिस्ती समाजबांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या समाजकंटकांना अटक होण्यासाठी शहरातील ख्रिस्ती समाजबांधवांच्या वतीने तोफखाना व कोतवाली पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली आहे. 

हे आक्षेपार्ह लिखाण त्वरीत थांबवून या प्रकरणातील समाजकंटकास तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रास्तारोकोसह आत्मदहन करण्याचा इशारा ख्रिस्ती समाजबांधवांनी दिला आहे.यावेळी राहुल पाटोळे, विनोद कदम, सतिष जाधव, अतुल शिंदे, रोहित जाधव, सुनित ढगे, बबलू ढगे, सचिन भिंगारदिवे, राजू देठे, हरिष आल्हाट, डॅनियल काळोखे आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.