शेतकरी व व्यापाऱ्यांची फायनान्स कंपनीकडून २३ लाखांची फसवणूक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कर्जाच्या आमिषाने २५ टक्के रक्कम भरून घेऊन नेवासे, श्रीरामपूर व गंगापूर तालुक्यातील ३२ शेतकरी व व्यापाऱ्यांची २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या माता अनुसया फायनान्स (एमएएफसी प्रायव्हेट लिमिटेड) या मायक्रो फायनान्स कंपनीच्या नितीन रामचंद्र माळी (बेटावद, जि. धुळे), प्रणाली विजय मोरे (देहूरोड, पुणे) व गणेश बाबुराव महिरे (मोरगेवस्ती, श्रीरामपूर) यांच्या विरोधात नेवासे पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
Loading...

याबाबत गोणेगाव येथील अप्पासाहेब चांगदेव दिघे यांनी फिर्याद दिली आहे. जानेवारीत दिघे हे वीटभट्टीकरिता कर्ज घेण्यासाठी माता अनसूया फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे संचालक नितीन रामचंद्र माळी, प्रणाली विजय मोरे, गणेश बाबुराव महिरे व इतर कर्मचारी होते. 


माळी, मोरे व महिरे यांनी त्यांना कर्जाबाबत माहिती दिली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची फाईल बनवून हेड ऑफिसला पाठवून देऊ. तुमचे कर्ज वीस दिवसांत मंजूर होईल. प्रोसेसिंग फी म्हणून ६ हजार ८५० रुपये भरावे लागेल, असे त्यांनी सांगितले. २९ जानेवारीला दिघे यांनी महाराष्ट्र बँकेच्या नेवासे शाखेतून माळी याच्या अक्सिस बँकेच्या नगर येथील खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे जमा केले. 


७ फेब्रुवारीला माळी याने दिघे यांना फोन करून कर्ज मंजूर झाले असून पत्र घेऊन जा, असे सांगितले. माळी याने १४ लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र दिले. प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स व इतर काही असे ४८ हजार रुपये दिघे यांनी १७ फेब्रुवारीला कंपनीच्या खात्यावर जमा केले. 


यानंतर माळीकडे विचारणा केली असता मार्चअखेर चालू असल्यामुळे सध्या फाईल बंद असल्याचे सांगून दहा एप्रिलनंतर कर्ज मिळेल असे स्पष्ट केले. दहा एप्रिलनंतर विचारणा केली गहाण खत करण्यासाठी २८ हजार रुपये खात्यावर जमा करण्यास माळीने सांगितले. मात्र, नोंदणीसाठी येण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर काही दिवसांनी दिघे यांना समजले मळगंगा कॉम्प्लेक्समधील कंपनी बंद झाली आहे. 

त्यांनी माळी यांना फोन करून कर्ज प्रकरण करायचे नाही, भरलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली. तथापि, दरवेळी काहीतरी सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने दिघे यांना आपण फसवले गेल्याची खात्री झाली. दिघेप्रमाणेच ३२ जणांची सुमारे २३ लाखांची फसवणूक झाली आहे. यात अनेक मान्यवर असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.