अहमदनगर जिल्हा विभाजनाचे तुणतुणे एकदाचे बंद करा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मी सन १९८०-९० मध्ये विधानसभेत असल्यापासून आजतागायत गेली ४० वर्षे अहमदनगर जिल्हा विभाजनाचे तुणतुणे वाजत आहे. पुढारी कशासाठी ही पत्रकबाजी करतात हे समजण्यास मार्ग नाही. विभाजन करायचेच असेल तर एका फटक्यात विभाजन करून टाका. अन्यथा जनतेला कोंबड्यांना दाणे टाकल्यासारखे नादी लावण्याचे प्रकार करू नका, असे प्रतिपादन माजी आ.संभाजीराव फाटके यांनी केले.
Loading...

राज्यामध्ये नगर जिल्हा हा मोठा जिल्हा असून त्याचे विभाजन आवश्यक आहे,हे मान्य; परंतु हे भिजत घोंगडे ठेवले कशासाठी? मी आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.अ.र.अंतुले यांनी एकाच फटक्यात औरंगाबाद-जालना, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर-उस्मानाबाद, गडचिरोली-चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यांची निर्मिती केली. विभाजनाचे निर्णय धाडसाने व तत्परतेने वेळीच घेणे हे महत्वाचे ठरते. विभाजन व्हावे ही आमची इच्छा आहे. विभाजन केल्यास जनतेला, शेतकऱ्यांना काय फरक पडणार आहे?


यदा कदाचित श्रीरामपूर जिल्हा झाला तर लोकांना नगर ऐवजी श्रीरामपुरला जावे लागेल, यापेक्षा वेगळे काय होणार आहे? विभाजनाने रोजगार वाढेल का? शेतकरी आत्महत्या थांबतील का? शेतमालाला रास्त भाव मिळेल का? शेतकऱ्यांचा पाणी व वीजेचा प्रश्न सुटेल का ? 


आज जनता दुष्काळात होरपळत असताना त्यावर बोलण्याऐवजी पुढारी भलतीच दिशाभूल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय बरोबर आहे किंवा चुकीचा यावर भाष्य करणे योग्य नसून त्यांनी निर्णय घेण्याचे धाडस दाखवले हे महत्वाचे आहे,असेही ते म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.