भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे ‘ठग ऑफ महाराष्ट्र’!: विखे पाटील


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मागील 4 वर्षांपासून राज्यात केवळ ठगबाजी करणारे भाजप-शिवसेनेचे सरकार ‘ठग ऑफ महाराष्ट्र’ असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप करणारी जनता आता महाराष्ट्रातील या ठगांनाही भूईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Loading...

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, शेकापचे नेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे आ. अबू आसिम आझमी, आ. कपिल पाटील, डाव्या आघाडीचे आ. जिवा पांडू गावीत उपस्थित होते. 


दुष्काळ, आरक्षणासारख्या ज्वलंत विषयांवर सरकार संवेदनशील नसल्याने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

त्यानंतर भाजप आणि शिवसेनेवर त्यांनी चौफेर हल्ला चढवला. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, सरकारने केलेली कोरड्या दुष्काळाची घोषणाही कोरडीच ठरली आहे. ही घोषणा करताना सरकारने कोणतीही भरीव मदत जाहीर केली नाही. 

दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यायचा असेल शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपये, तर फळबागा व ऊसाला 1 लाख रूपये हेक्टरी मदत जाहीर करावी; तसेच यंदाचे खरिपाचे 100 टक्के पीक कर्ज माफ करावे, दुष्काळी उपाययोजना अधिक शिथिल कराव्यात, आदी मागण्या त्यांनी लावून धरल्या.

सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मोठा आव आणून शेतकऱ्यांच्या जीवनात कसे परिवर्तन आणले, याच्या वल्गना केल्या. पण यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात 2300 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता हे प्रमाण अधिक वाढण्याची भीती आहे. 

या सरकारने कधी नव्हे ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर स्वतःचे सरण रचून आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आणली आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर भीषण वेळ ओढवलेली असताना, भाजप-शिवसेना सरकार मात्र शेती क्षेत्रात क्रांति आणल्याचा आव आणते, ही ठगबाजी असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.