साई संस्थान अध्यक्ष डॉ. सुरेश हावरेंना प्रवेशबंदी करण्याचा इशारा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी साईसंस्थानचा पैसा विदर्भातील सरकारी रुग्णालयांना देण्याऐवजी संस्थानची रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी द्या, या मागणीसाठी ग्रामस्थ आंदोलन करत असताना संस्थानच्या अध्यक्षांनी मात्र जमिनी घेण्यासाठी हे आंदोलन असल्याच्या आरोप केल्याने शिर्डीकर संतापले. 
Loading...

संस्थानकडे कोणी जमिनी घेण्याचा प्रस्ताव दिला आहे, त्यांची नावे जाहीर करा; अन्यथा जाहीर माफी मागा. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याबरोबर त्यांना शिर्डीत प्रवेश बंद करण्यात येईल, असा इशारा उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर व माजी उपनगराध्यक्ष विजय कोते यांनी शुक्रवारी दिला.

साईबाबांच्या झोळीतला पैसा शिर्डीचा विकास झाल्याशिवाय बाहेर देऊ नये, यासाठी काँग्रेसने साईसंस्थानच्या विश्वस्तांविरोधात मागील पंधरवाड्यात आंदोलन केले. जमिनी खरेदी-विक्री करण्याचा धंदा असलेल्या काँग्रेसच्या एका गटाने हे आंदोलन केल्याचा आरोप संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी केला. काँग्रेसच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन देऊन आंदोलन करणाऱ्या १७ काँग्रेस कार्यकर्त्यांपैकी त्यांच्या जमिनी संस्थानने घ्याव्यात यासाठी प्रस्ताव दिला आहे का, ज़र असा प्रस्ताव दिला असेल, तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, जर आंदोलकांपैकी कोणीही त्यांच्या जमिनी संस्थानला देण्याबाबतचा प्रस्ताव दिला नसेल, तर अध्यक्षांनी साईभक्त व ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी कोते यांनी केली. 

मागील दोन वर्षांत संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डीत कोणतेही काम केले नाही. शिर्डीच्या विकासासाठी एक पैसाही दिला नाही. उलट पूर्वीच्या विश्वस्तांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न हावरे करत आहेत.

साईसेवेची वर्षपूर्ती पुस्तिका उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित करून स्वत:ची टेरी बडवून घेणाऱ्या हावरेंनी ही पुस्तिका लपवून का ठेवली. खरेच तुम्ही शिर्डीचा विकास केला असेल, तर ही पुस्तिका जनतेला उपलब्ध करून द्यावी, असे आव्हान गोंदकर व कोते यांनी दिले. 

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री निधीला ५० कोटी निधी देण्याचा निर्णय संस्थानने घेतला. या निर्णयाला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा हावरेंचा दावा धादांत खोटा आहे. या पक्षांनी हा निधी देण्यास लेखी विरोध नोंदवला आहे. साईबाबांच्या नगरीत सतत खोटे बोलून साईभक्त व शिर्डीकरांची हावरेंनी दिशाभूल केली. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागेही हावरेंचीच कूटनिती होती, असे गोंदकर व कोते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.