शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून, शहर व जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी करण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शहरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखाने माजी तालुकाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी केल्याने माजी तालुकाप्रमुखाने थेट पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करत या दोघांचीच हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. 
Loading...

संगमनेर शहरात जिल्हाप्रमुखासह स्थानिक पदाधिकारी पत्रकबाजीमुळे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून माजी तालुकाप्रमुख, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी केल्याचे पत्रक शहरप्रमुख अमर कतारी आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या सहीने प्रसारमाध्यमांकडे पाठवण्यात आले. त्यावरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला असतानाच वाकचाैरे यांनी दुसरे पत्रक काढत संबंधितांची तक्रार थेट 'मातोश्री'कडे केली आहे. 

माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी संगमनेरमध्ये येत शिर्डीतून खासदारकीची निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असतानाच आता येथील पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. 

शिवसेनेत अनेक गट निर्माण झाले असून ही गटबाजी मोडून काढण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे. अंतर्गत गटबाजीचे पडसाद अधूनमधून उमटत असतात. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने कोणी बघत नाही. आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आलेल्या या गटबाजीमुळे शिवसेना वादात सापडली आहे 

दरम्यान, हकालपट्टीचा अधिकार केवळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना आहे. माझी हकालपट्टी करण्याचा अधिकारच या पदाधिकाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट करत पक्षशिस्त मोडून पदाचा गैरवापर करणाऱ्या जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व शहरप्रमुख अमर कतारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी कैलास वाकचौरे यांनी ठाकरेंकडे केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.