शिर्डीतील 'त्या' तरुणाचा मित्रांनीच केला खुन .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटर प्रकाश वाघमारे याचा खून त्याच्या मित्रांनीच केल्याचे तपासात पुढे आले आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येऊन या गुन्ह्यात आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. 

त्यात चार आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते. या आठही जणांवर खून करणे, पुरावा नष्ट करणे, अपहरण करणे व संघटितपणे कृत्य करणे अशा विविध कलमांखाली शिर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Loading...
ग्रामपंचतीत काम करणाऱ्या प्रकाश वाघमारेच्या खुनानंतर सावळीविहीरलगतच्या पाच गावांत मोठा असंतोष निर्माण झाला होता. वाघमारे याचा मोठा जनसंपर्क होता. गरीब कुटुंबातील अविवाहित तरुणावर हा प्रसंग ओढावल्याने या कुटुंबाच्या पाठीशी सारे गाव उभे राहिले होते. 

६ नोव्हेंबरला प्रकाश घराच्या बाहेर पडला. तो परत घरी आलाच नाही. दिवाळी असल्याने तो कोणाकडे तरी गेला असावा, असे घरच्यांना वाटले. मात्र दुसऱ्या दिवशी शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांना निमगाव शिवारात मिळुन आला. 

गावकऱ्यांनी या खुनाचा तपास करून मारेकऱ्यांना अटक करा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी या खुनात सहभागी असणाऱ्यांना शिताफीने अटक केली. याप्रकरणी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुन केल्याची कबुली दिली आहे. मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन लोणी येथे करण्यात आले.

नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची नावे जाहीर करून काय गुन्हा दाखल केला याची माहिती देण्याची मागणी अंत्यविधीप्रसंगी गावकऱ्यांनी केली. पोलिसांनी आठ तरुणांना या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे, असे सांगितले. 

मयताचा भाऊ राहुल सोपान वाघमारे याने शिर्डी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून प्रकाश बंडू विसपुते (वय ३२),अरबाज अनवर पठाण (वय १९), सागर नामदेव साळुंके (वय २३), प्रेम सुधाकर शेजवळ (वय २१) व चार अल्पवयीन आरोपींचा या खुनात सहभाग असल्याचे म्हटले आहे. भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ३६४ व ३४ या प्रमाणे विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींना कोणी मदत केली, ते कोणाच्या सहवासात होते, त्यांना कोणी आश्रय दिला, खुनाची कारणे या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. गुन्हेगार तसेच त्यांना पाठबळ देणारा, मदत करणारा कितीही मोठा असला, तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.