26 नोव्हेंबरला विधानभवनावर मराठ्यांचा धडक मोर्चा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा क्रांती मोर्चा आयोजित नगर जिल्ह्यातील मराठा संवाद यात्रेचा प्रारंभ व जिल्ह्यातील मार्ग, तसेच 26 नोव्हेंबरचे विधान भवनावरील आंदोलन याबाबत जोरदार तयारी करण्याच्या उद्देशाने नगर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक 13 नोव्हेंबर रोजी दु.12 वाजता गुरुदत्त लॉन्स, हॉटेल पूर्णा-कीर्ती समोर, पंपिंग स्टेशन रोड,सावेडी येथे आयोजित करण्यात आली आहे. 
Loading...

या बैठकीत मराठा संवाद यात्रेची तयारी करणे, संवाद यात्रेचा जिल्ह्यातील मार्ग निश्चित करणे व 26 नोव्हेंबरच्या विधानभवनावरील धडक आंदोलनाचे नियोजन करणे याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. 

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व मराठा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध क्षेत्रात कार्यरत समाजबांधवांनी सदर बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन नगर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

13 जुलै 2016 रोजी कोपर्डी (ता.कर्जत जि.अहमदनगर) येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी केलेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यांसह वीस मागण्यांसाठी आवाज उठवित संपूर्ण मराठा समाज पेटून उठला. 

शांततेत, शिस्तीत व संयमाने मराठ्यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या. ऐतिहासिक व अभूतपूर्व मराठा क्रांती मूक मोर्चांची सर्व जगाने नोंद घेतली. मात्र तरीही आज पर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सुटले नाहीत. भाजप सरकारने मराठा समाजास खेळवत ठेवून समाजाची घोर फसवणूक केली आहे. 

याविरोधात मराठा समाजात तीव्र संतापाची भावना आहे. मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले असल्याचा कांगावा भाजपशासित सरकार करत असले, तरीही प्रत्यक्ष मराठा समाजास अपेक्षित लाभ मिळालेला नाही हे वास्तव आहे. जिव्हाळ्याच्या आरक्षण प्रश्नासाठी पेटलेल्या आंदोलनात 40 पेक्षा अधिक मराठा तरुणांचे जीव गेले आहेत, तर चौदा ते पंधरा हजार मराठा आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वय समितीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 16 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक विभागात मराठा संवाद यात्रा व संवाद मेळावे, संवाद सभा घेण्यात येणार आहेत. दि. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या सर्व विभागातल्या मराठा संवाद यात्रा एकत्रित हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर धडकणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Loading...
Powered by Blogger.