पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील शिरापूर परिसरातील नरसाळे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांची मुलगी ठार झाली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली. 


Loading...
पावसा बरकडे यांचे कुटुंबीय बकऱ्या घेऊन वाडा लावण्यासाठी नरसाळेवाडी परीसरातील १७ व १८ क्रमांकाच्या चारीच्या मधोमध भागा भोसले यांच्या वस्तीवर गेले होते.रात्री आठ वाजता वाडा लावण्याची तयारी करत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने आठ वर्षांच्या सानिका पावसा बरकडे हिला फरफटत उसात नेले. तिच्या तोंडाचा बिबट्याने कडकडून चावा घेतल्याने सानिका मरण पावली. 

बरकडे यांची मुले जवळच खेळत होती. बरकडे व त्यांची पत्नी कोपीचे काम करत होते. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते घटनास्थळी आले. सानिका उसामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. त्यांचा आरडाओरड ऐकून भोसले वस्तीवरील लोक तेथे आले. मात्र, बिबट्या तोपर्यंत दिसेनासा झाला होता. 


सहा दिवसांपूर्वी कुंड परिसरातील ठुबे वस्तीनजीक वरखडे यांच्या शेतात गंगादादा बाबाजी वरखडे यांनी बिबट्याला पाहिले होते. वनखात्याने पिंजरा लाववा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, या मागणीची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. 


विजेच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त असून दिवसभर वीज नसल्याने रात्री शेतीला पाणी भरण्याशिवाय पर्याय नाही. वनखात्याने शिरापूर, चोंभूत, कुंडवस्ती येथे पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.