त्या वादग्रस्त ठिकाणास आ.बाळासाहेब मुरकुटे यांची भेट.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी मढी हे कानिफनाथांचे जागृत स्थान असून राज्यभरातील भाविकांची येथे वर्दळ असते. या परिसरातील सूर्यकुंडावर अघोरी विद्येच्या नावाखाली चालणारा प्रकार दुर्दैवी असून असे प्रकार थांबवण्यासाठी सामाजिक जागृती वाढवावी. प्रशासनानेही योग्य ती दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्त केली. 


Loading...
सूर्यकुंडाजवळ महिलांना नग्न होऊन पूजा करण्यास भाग पाडले जात होते. हा प्रकार उजेडात येताच जादूटोण्याचा नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांची सूर्यकुंडाजवळची वर्दळ पूर्णपणे थांबवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी अहोरात्र तैनात आहेत. 

आमदार मुरकुटे यांनी वृद्धेश्र्वर, चैतन्य कानिफनाथ व मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सूर्यकुंडाला भेट दिली. डोंगरदऱ्यात फिरत परिसराची पाहणी केली. या वेळी अजित मुरकुटे, भाऊराव नगरे, सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के, नाथा मरकड, गोरक्ष मरकड, बबन मरकड, गणेश पाखरे, वन कर्मचारी राजेंद्र मरकड, विष्णू मरकड, देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, बबन मरकड, सागर निकम, बाळासाहेब मरकड, सुरेश मरकड, रामा चोधे आदी उपस्थित होते. 


सूर्याकुंडाकडे येणारी गर्दी कमी झालेली नाही. अमावास्येला असे काही प्रकार घडतात का, हे पाहण्यासाठी गर्दी वाढली होती. साध्या वेशातील पोलिसही उपस्थित होते. वन कर्मचारी पहाटे चारलाच सूर्यकुंडाजवळ आले. जांभळाच्या झाडाला ठोकलेल्या काळ्या बाहुल्या, लिंबू, दाभण ग्रामस्थांनी यापूर्वीच हटवले आहेत. परिसर स्वच्छ केल्याने आता तेथे भकासपणा जाणवत नाही. 


आमदार मुरकुटे म्हणाले, नाथ सांप्रदायात भक्ती व सेवेला महत्त्व दिले जाते. जातीभेदा पलीकडे जाऊन या सांप्रदायाने लोककल्याणाचे काम केले. या सांप्रदायाच्या नावाखाली असले प्रकार संतापजनक व किळसवाणे वाटतात. एकविसाव्या शतकात मंत्र, तंत्र, गंडे-दोरे व अघोरी विद्येच्या नावाखाली फसवणूक होत असेल, तर सामाजिक प्रगती होणार नाही. कोणत्याही धर्मात कोणत्याही देवाने असे प्रकार सांगितलेले नाहीत. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.