'हमे तो कांदेने लुटा, कपाशी मै कहा दम था, जहा ऊस लगाया वहा पाणी भी कम था !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हमे तो अपनोने लुटा, गैरो में कहा दम था ! मेरी किस्ती थी तुटी वहा जहा पाणी कम था !! हे दिलवाले या हिंदी चित्रपटातील गाणे आपल्याला आठवत असेलच. याच गाण्याच्या चालीवर शेतकऱ्यांची परिस्थिती आणि त्यांची व्यथा मांडली आहे, ती एका ट्रॅक्टरच्या माध्यमातून. 'हमे तो कांदेने लुटा, कपाशी मी कहा दम था, जहा ऊस लगाया वहा पाणी कम था ' अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ते वाचल्यानंतर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. 

Loading...
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था खरोखर दयनीय आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण खूप अल्प असून, आताच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अशातच शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, पाणीच नसल्याने कांदा कसा उगवणार आणि ऐन हंगामात बाजारभाव मिळत नसल्याने खर्चही निघत नाही. डोक्यावर कर्जाचा बोजा होवून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

अशीच परिस्थिती कपाशीची आहे. कपाशीचे वजन करताना व्यापारीच काटा मारीत असल्याची क्लिप सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली आहे. म्हणजे प्रत्येक जण केवळ शेतकऱ्याला लुटत आहे. तर एवढ्यावर मात करून कसेबसे उसाचे उत्पादन घेतले खरे. परंतु, पाऊसच नाही तर पाणी कोठून येणार ? ऊस लावला तर पाणी नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे 'राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर दाद मागायची कोणाकडे ? अशी म्हण आहे.


मात्र, आता त्याहूनही वेगळी स्थिती आहे. 'निसर्गाने मारले आणि शासनाने सोडून दिले' तर दाद मागणार कोणाकडे ? अशी अवस्था झाली आहे. संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतकरी पाणी, चारा, हाताला काम मागत आहे. तर राजकीय नेते मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. हजारो, लाखो कोटींचे घोटाळे करून उद्योगपती फरार होत आहेत, अधिकारी हप्ते घेवून नागरिकांना अक्षरश: लुटीत आहेत.

निवडणुकीच्या काळात मते मागायला प्रत्येकाच्या दारात येवून आश्वासनांचा पाऊस पाडतील. परंतु, सध्या खायला काहीच नाही, याबाबत मात्र कोणीच काही बोलत नाही. प्रत्येकाला केवळ निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कळवळा केवळ निवडणुकीपुरताच आहे, हे आता सर्वांना समजले आहे. हीच परिस्थिती एका शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरवर लिहून मांडली आहे. त्यामुळे आता तरी शासन जागे होणार का ? हा साधा प्रश्न एक शेतकऱ्याने मांडला असून, शासन यावर गांभीर्याने विचार करणार का?

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.