संभाव्य टंचाई परिस्थितीमुळे पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित करण्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांचे निर्देश

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणीसाठे आरक्षित करण्‍याचे निर्देश राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले

येथील नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती शालिनीताई विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, विजयराव औटी, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, राहुल जगताप, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्‍हाधिकारी प्रशांत पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री भोर आदिची उपस्थिती होती.

यावैळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, जिल्‍हयात आतापर्यत सरासरीच्‍या केवळ 69.32 टक्‍के इतका पाऊस झाला आहे. सर्वच ठिकाणी पावसाची सरासरी कमी आहे. प्रत्‍येक तालुक्‍यात पावसाने मोठा खंड दिला आहे. गेल्‍या तीन वर्षाच्‍या तुलनेतही या वर्षी पाऊस कमी आहे. त्‍यामुळे या टंचाई परिस्थितीचा समाना करण्‍यासाठी आपण आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे.

सध्‍या जिल्‍हयातील 868 गावांमधील भूजल पातळी मागील पाच वर्षाच्‍या तुलनेत किमान एक ते कमाल 3 मीटरने घटली आहे. काही गावात 3 मीटरपेक्षाही जास्‍त घट भूजल पातळीत झाली आहे. त्‍यामुळे आगामी काळात टंचाईचा सामना करावा लागू शकतो. हे पाहता जिल्‍हयातील विविध प्रकल्‍पातील पाणी साठा आरक्षित करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी ही कार्यवाही तात्‍काळ करावी असे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले.

सध्‍या जिल्‍हयात 54 टॅंकर सुरु आहेत. यात पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक 24 तर संगमनेर तालुक्यात 16 आणि पारनेर तालुक्‍यात 12 टँकर सुरु आहेत. टँकरसाठी स्‍थानिक परिस्थिती विचारात घेऊन मागणीनुसार तात्‍काळ मंजूरी देण्‍याचे निर्देश जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत असे प्रा. शिंदे यांनी सांगितले. 

या शिवाय पावसाने ओढ दिल्‍याने खरीपाच्‍या पिकावरही परिणाम झाला आहे. पिक परिस्थितीचा अंदाज घेऊन तात्‍काळ नजर अंदाज पैसेवारी काढण्‍याच्‍या सूचना प्रशासनाला देण्‍यात आल्‍या आहेत. याशिवाय जिल्‍हयातील पशुधनाला पाच महिने पुरेल एवढाच चारा सध्‍या उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाने आताच नियोजन करुन संभाव्‍य टंचाई परिस्थितीत चा-याचे नियोजन होईल यासाठी उपाययोजना हाती घेण्‍याची सूचना त्‍यांनी दिल्‍या.

जिल्‍हयात एक लाख 53 हजार 972 लाभार्थ्‍याना बोंड अळीसाठीचे 83 कोटी 51 लाख 29 हजार इतके अनुदान त्‍यांच्‍या बँक खात्‍यावर वर्ग करण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. संभाव्‍य टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन रोजगार हमी योजने अंतर्गत 34 हजार 982 कामांचे सेल्‍फ तयार करण्‍यात आले असून त्‍याची एकूण मजूर क्षमता 43 लाख 89 हजार इतकी आहे. सध्‍या जिल्‍हयात रोहयोची 1 हजार 902 कामे सुरु असून त्‍यावर 6 हजार 933 मजूर काम करत असल्‍याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.