आगामी निवडणुकीत नगरची महापालिका भाजपकडेच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरच्या महापालिका निवडणुकीत समविचार पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आहे. परंतू त्यांना युती मान्य नसले तर भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
Loading...

तसेच आगामी निवडणुकीत नगरची महापालिका भाजपकडेच येईल,असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी करुन सर्वांनी एकत्र येऊन महापालिका आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

खा. दानवे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या कोअर समितीची बैठक झाली. त्या बैठकीला पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी शहर जिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर आदी उपस्थित होते. 

या बैठकीनंतर खा. दानवे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शहरात गटतट राहिले नाही. महापालिका भाजपच्या ताब्यात आणणे हे एकमेव उद्दिष्टे आहे. त्यामुळे सर्व एकत्रिपणे महापालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

राज्यातील पंधरा महापालिका व दहा जिल्हा परिषदा भाजपच्या ताब्यात आहेत.सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे. युती करायला ते तयार असतील तर चांगलेच आहे. सन्मानाने युती व्हावी. ते येणार नसतील तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार. शिवसेनेचा चार वर्षातील आमचा चांगला अनुभव राहिला आहे. 

आमच्यामध्ये संघर्ष झाला नाही. आम्ही मंत्रिमंडळाचे निर्णय एकत्र बसून घेतो. शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची भूमिका वेगळी आहे, आमची भूमिका वेगळी आहे. यापूर्वी देशात आमच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आले होते. त्याचा कुठलाही परिणाम यापुर्वीही पक्षावर झाला नव्हता आणि आताही होणार नाही.असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.