महापालिकेत आयुक्त-महापौरांमध्ये सुप्त संघर्षाचे दर्शन !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- फेज-२ पाणी योजनेचा आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा घेतल्यानंतर लगेच शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनीही या योजनेच्या कामांचा स्वतंत्र आढावा घेतला. आयुक्त-महापौरांतील सुप्त संघर्षाचे हे दर्शन महापालिकेत चर्चेचे झाले.

Loading...
फेज-२ पाणी योजनेचे काम मागील आठ वर्षांपासून सुरू आहे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा २५ टक्के वाढल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, योजनेतील अनेक कामे अजूनही अपूर्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त-जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मागील शुक्रवारी या पाणी योजनेचा संबंधित ठेकेदार व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

या बैठकीस महापौर कदम यांच्यासह अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला बोलावले गेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी महापौर कदम व विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी या योजनेचा स्वतंत्र आढावा घेतला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शहरांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी हायड्रोलिक टेस्टींगचे काम सुरू ठेवले जावे, मुळा धरण येथील जॅकवेलच्या वॉटर कुपिंगचे काम तातडीने सुरू केले जावे, कल्याण रोड-नागापूर-बोल्हेगाव परिसरातील मोठ्या टाक्यांना जोडणाऱ्या पाईपलाईनचे काम मार्गी लावले जावे, महामार्ग छेदून पाईपलाईन टाकण्याचे काही ठिकाणी रखडलेले काम पूर्ण करून घेतले जावे, अशा विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.