पावसाचा अंदाज चुकल्याने हवामान खात्याने नुकसानभरपाई द्यावी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- यंदा पावसाचे सर्वच अंदाज चुकल्याने हवामान खात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने यांनी केली. परजणे म्हणाले, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. खरीपाचे क्षेत्र वाया तर गेले, रब्बी हंगामाच्याही आशा मावळल्याने हवामान विभागाने चुकीचे अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई हवामान विभागाने नैतिक जबाबदारी स्वीकारुन द्यावी.


Loading...
पावसाविषयीच्या दिर्घकालीन अंदाजात अचुकता साधण्यात मात्र हवामान विभागाला यश आलेले नाही. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. हवामान खात्याने वेळोवेळी जाहीर केलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन केले. सरकारने देखील यावर कोट्यवधी रुपये खर्च केले असे असताना प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.पावसाने प्रत्येक वेळी हुलकावणी दिल्याने कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग, मूग, कांदा आदी पिकांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला.

रब्बी हंगामाच्याही आशा मावळल्याने यावर्षी दुष्काळाची गडद छाया सर्वत्र पसरली आहे.अपुऱ्या व अनियमीत पावसामुळे बहुतांश भागातील भूजलपातळी खालावलेली आहे. धरणसाठ्यातही अपेक्षित पाणीसाठा नाही. नाशिक विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण 571 प्रकल्पातील पाणी साठवणुकीची 209.50 टी.एस.सी. इतकी क्षमता असताना सद्यस्थितीत 135.92 टी.एम.सी. म्हणजे 65 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. या पाण्यातून चालू वर्षी शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठीचे नियोजन करताना पाटबंधारे विभागला मोठी कसरत करावी लागणार आहे.

मशागतीपासून ते शेतमाल वाहतुकीपर्यंतचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. शेतीसाठी अनियमित वीजपुरवठा वाढीव वीज दराने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ स्थिती आहे. शासनाने दुष्काळी भागाची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी मागणीही परजणे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केल्याची माहिती पत्रकात दिली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.