‘नगर दक्षिण’ ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी लोकसभा निवडणुकीत ‘नगर दक्षिण’ ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार असल्याचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबई येथील रविवारी (दि. 7) झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत बैठक झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससाठी सोडायचा नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Loading...
या मतदारसंघातून दादाभाऊ कळमकर, प्रताप ढाकणे, प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आ. अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणीही पुढे आली आहे.नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीच्या रस्सीखेचीत विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे पारडे जड झाले आहे. मुंबईत रविवारी झालेल्या बैठकीत जगताप यांच्या नावाची एकमुखी मागणी दक्षिण नगर जिल्ह्यातून झाली.

नगर लोकसभा मतदारसंघात मागील १० वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार नाही. त्यामुळे या वेळी पक्षाने चंग बांधला असून, नगरची जागा जिंकायचीच, असा निर्धार केला आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरचे दौरे करून पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले व आताही येत्या दोन दिवसांत अजित पवार पुन्हा नगरला येणार आहेत.

दक्षिण लोकसभेच्या जागेसंदर्भात संभ्रम निर्माण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यासाठी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी प्रफुल्ल पटेल, खा. विजयसिंह मोहिते, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, मधुकर पिचड, दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, पांडुरंग अभंग, आ. जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, सुजित झावरे, अभिषेक कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.