पालकमंत्री राम शिंदेंच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चार दिवसांपासून न्याय व हक्कांच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांची आज पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात गळचेपी करण्याचा प्रयत्न झाला. पालकमंत्र्यांना या शेतकऱ्यांना भेटून तर दिले नाही. उलट आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या दबावाला बळी पडून शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा प्रकार नेवासे शहरात घडला. 

Loading...
आंदोलकांवरच कारवाई करीत जबरदस्तीने त्यांचे आंदोलन मोडून काढल्याचा आरोप आंदोलक भाऊसाहेब ससे, विजय वाघ व पांडुरंग होंडे यांनी केला आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पांडुरंग होंडे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यापासून रोखत त्यांना व सर्वच आंदोलकांना सायंकाळी अटक केली. 

पांढरीपूल औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी संपादित करण्यात आलेले शेतकरी प्रदिर्घ काळापासून ठोस नुकसान भरपाई, हक्काचा रोजगार यापासून वंचित आहेत. गेली वर्षानुवर्षे त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा करुनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. जमिनी संपादनाच्यावेळी आश्वासन दिल्याप्रमाणे रोजगार मागण्यासाठी गेलेल्या भूमीपुत्रांना गुंडांद्वारे दहशत निर्माण करुन पळवून लावण्यात येत असल्याची तक्रारही त्यांनी यापूर्वीच केली आहे. 

तालुक्‍याचे आमदार बाळासाहेब मुरकूटे यांच्याकडे शिंगवेतुकाई, लोहगांव, वाघवाडी, झापवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी याबाबत गाऱ्हाणे मांडून न्याय देण्याची मागणी केली असता त्यांनी भूमीपूत्र शेतकऱ्यांच्या तक्रारीची भीती दाखवून नातेवाईक, बगलबच्च्यांना कंपन्यांतील विविध कामांच्या कंत्राटांचा फायदा मिळवून देत तक्रारदारांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी आहे. 

आंदोलनाचे तीन दिवस उलटले तरीही ना लोकप्रतिनिधी फिरकले ना त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना याकडे फिरकू दिले अशी खंत त्यांनी यात व्यक्‍त केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी स्वतःचे व उद्योजकांचे हित जपत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे म्हटले आहे. दि. 5 ऑक्‍टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तालुका दौऱ्यावर असताना त्यात या आंदोलनाचा उल्लेखही नसल्याने पुरते हवालदिल झालेल्या आंदोलकांनी त्यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. 

मात्र तरीही यावर सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना आंदोलनस्थळी फिरकू तर दिलेच नाहीच मात्र आत्मदहन करण्यापासून रोखत महसूल व पोलीस अधिकाऱ्यांकरवी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन ते मोडीत काढल्याचा सनसनाटी आरोप या आंदोलकांनी केला आहे. यापुढील काळात आमच्या हक्क आणि भावनांशी खेळ खेळल्याची किंमत लोकप्रतिनिधींना मोजावी लागेल असा गर्भित इशाराही त्यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.