आढळगावच्या सरपंचावरील अविश्वास नामंजूर मात्र उपसरपंचावरील अविश्वास मंजूर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मीरा देवराव वाकडे आणि उपसरपंच जिजाराम महादेव डोके यांच्यावर १३ पैकी ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तहसीलदार महेंद्र महाजन यांनी आज ( ५ ऑक्टोबर ) रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलविली होती.या सभेत चार सदस्य गैरहजर राहिल्याने सरपंच मीरा वाकडे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव नऊ विरुध्द शून्य मतांनी नामंजूर झाला. 

Loading...
मात्र उपसरपंच जिजाराम डोके यांच्यावरील अविश्वास नऊ विरुध्द शून्य मतांनी मंजूर झाला. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३५(३) नुसार महिलेकरिता राखीव असलेल्या सरपंच पदावरील अविश्वास ठराव मंजूरीसाठी तीन-चतुर्थांश बहुमताची गरज आहे. तेरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये दहा सदस्य असल्याशिवाय अविश्वास मंजूर होत नाही. 

मीरा वाकडे यांच्या विरोधात केवळ नऊ सदस्य गेल्याने त्यांचा ठराव नामंजूर झाला. इतरांच्या बाबतीत दोन- तृतीयांश बहुमतांची आवश्यकता आहे म्हणजे तेरा पैकी नऊ सदस्यांच्या बहुमताने अविश्वास मंजूर होय शकतो. त्यामुळे जिजाराम डोके यांच्या उपसरपंच पदाचा अविश्वास मंजूर झाला. मीरा वाकडे यांच्यावर आता ३५ (३-अ) नुसार एक वर्षे म्हणजे ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अविश्वास ठराव दाखल करता येणार नाही.

तथापि मीरा वाकडे यांना येथून पुढे ग्रामपंचायतीचे कामकाज करतांना नऊ विरुध्द चार असा सामना करावा लागेल आणि अल्पमतात राहून कामकाज पहावे लागेल.त्यांच्या इच्छेप्रमाणे एकही ठराव मंजूर होऊ शकणार नाही. अविश्वास प्रस्तावावर सही करणारे प्रदीप नानाभाऊ बोळगे हे सदस्य ऐनवेळी विशेष सभेला गैरहजर राहिले आणि अविश्वासाच्या प्रस्तावावर ज्यांची सही नव्हती ते विजय शिवाजी वाकडे हे सदस्य सभेला हजर राहून त्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.