महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र शासनाच्या एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन अर्थात नीम योजनेतून एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला लागलेल्या युवा कामगारांचा प्रशिक्षण कार्यकाळ पुर्ण झाल्यास त्यांना सेवेत सामाऊन घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. तसेच नीम योजनेतील युवा कामगारांची पिळवणुक होत असताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून याबाबत अहवाल मागविण्याची आग्रही भुमिका मांडण्यात आली.

नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन योजनेतून एमआयडीसीतील कंपनीत लागलेल्या युवा कामगारांची संख्या 5 ते 7 हजार आहे. या कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. छोट्या कंपन्या पासून तर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. निम योजनेअंतर्गत दहावी, बारावी उत्तीर्ण व आयटीआय, डिप्लोमाधारक कामगारांचा भरणा केलेला असून, सदर कामगारांना प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलेले आहे. 

या कामगारांना 36 महिन्यापर्यंत नोकरीची हमी दिली गेली असून, त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देऊन कार्यमुक्त केले जात आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळत आहे. या प्रशिक्षणार्थी कामगारांना प्रत्यक्षात उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करणे भाग पडते. मात्र त्यांना प्रॉव्हिडंट फंड, वीस दिवसाला एक राजा, बोनस इत्यादी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या कामगारांचा अपघात झाला असता नुकसान भरपाई कामगार कायदा 1923 ची अंमलबजावणी होत नाही. कंपनीत असलेल्या या कामगारांना वेठबिगारी सारखे राबवून पुर्ण कामे करुन घेतली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

सदर कामगारांचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण झाले असता त्यांना प्रमाणपत्र देऊन कामावरुन काढले जाते. प्रशिक्षण कार्यकाळ पुर्ण केलेल्या प्रशिक्षित कामगारांना कंपनीच्या सेवेत सामाऊन घ्यावे, नीम योजनेतंर्गत भरती झालेल्या कामगारांची होत असलेल्या पिळवणुकीबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांना चौकशीचे आदेश देऊन 15 दिवसाच्या आत अहवाल मागविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे चिटणीस चंद्रकांत ढवळे, बाळासाहेब ढवळे, बाळासाहेब शिंदे, नितीन निमसे, किसन गव्हाणे, संकेत सोमवंशी, रामभाऊ सप्रे, समाधान पाटील, संतोष राऊत, दत्ता गायके आदी उपस्थित होते. याप्रकरणी कामगारांना न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.