स्वस्तधान्य दुकानांतील धान्य नको असेल तर मिळतील ८०७ रुपये !स्वस्तधान्य दुकानांतील धान्य, तांदूळ नको असणार्‍या रेशनकार्डधारकांना रोख रक्‍कमेचे अनुदान अदा करण्याचा निर्णय नुकताच घेतला गेला आहे. त्यानुसार धान्य नको असणार्‍या अंत्योदय कार्डधारकास 807 रुपये 64 पैसे तर प्राधान्य कुटुंबातील प्रती व्यक्‍तीस 112 रुपये 39 पैसे अनुदान उपलब्ध केले जाणार आहे. 

Loading...
अन्‍नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून आजमितीस प्राधान्य कुटुंबातील रेशनकार्डधारकास प्रति व्यक्‍ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू दरमहा स्वस्तधान्य दुकानांतून उपलब्ध केले जात आहे. अंत्योदय रेशनकार्ड असणार्‍या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 17 किलो तांदूळ व 18 किलो गहू असे एकूण 35 किलो धान्य दरमहा दिले जात आहे.

थेट धान्य व धान्य नको असल्यास रोख स्वरुपात अनुदान असे दोन पर्याय रेशनकार्डधारकांना उपलब्ध केले आहेत. स्वस्तधान्य नको असेल, त्यांना रोख रक्‍कमेच्या स्वरुपात अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार प्राधान्य कुटुंब रेशनकार्डमधील प्रती व्यक्‍तीस दोन किलो तांदळापोटी 53 रुपये 32 पैसे व तीन किलो गव्हापोटी 59 रुपये सात पैसे असे एकूण पाच किलो धान्यांसाठी एकूण 112 रुपये उपलब्ध केले जाणार आहेत.

अंत्योदय प्रकारचे रेशनकार्ड असणार्‍या कार्डधारकास 17 किलो तांदळापोटी 453 रुपये 22 पैसे तर 18 किलो गव्हापोटी 354 रुपये 42 पैसे असे एकूण 807 रुपये 64 पैसे उपलब्ध केले जाणार आहेत. ही सर्व रक्‍कम रेशनकार्डावरील कुटुंबप्रमुख महिलेच्या नावावर बॅकेत जमा केली जाणार आहे.

शासनाचा हा निर्णय मात्र ऐच्छिक आहे. त्यामुळे या संधीचा लाभ किती रेशनकार्डधारक घेतात, याकडे लक्ष लागले आहे. लवकरच ही योजना राज्यभरात सुरु होणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.