राष्ट्रवादीचे मिशन ‘नगर लोकसभा’, हे पाच जण आहेत लोकसभेसाठी इच्छुक.


भाजपकडून लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे झाल्यास महाराष्ट्रात डिसेंबरच्या आसपास एकत्रित निवडणूक होऊ शकते किंवा वेळेत झाल्यास मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होऊ शकते. या दोन्ही शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी जवळपास निश्‍चित झालेली आहे. जागा वाटपात जिल्ह्यातील नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर शिर्डी कॉंग्रेसकडे आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केलेली आहे.
Loading...

मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला हा मतदारसंघ सोडण्याची मागणी कॉंग्रेसकडून होत आहे. मात्र, जिल्हा राष्ट्रवादीकडून त्यावर अजून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादीकडूनही लोकसभेसाठी पाच- सहा जणांची नावे चर्चेत आहेत.

नगर जिल्ह्याकडे पक्षाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ पक्षाध्यक्ष शरद पवार व त्यानंतर त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरला विविध कारणानिमित्ताने दौरे केल्याने नगर लोकसभा मतदारसंघ पक्षाने टार्गेट केल्याचे दिसू लागले आहे. 

त्यामुळे येत्या रविवारी (७ ऑक्टोबर) मुंबईत विशेष बैठक आयोजित केली गेली आहे. राष्ट्रवादीकडून पाच जण इच्छुक असल्याने कोणाचे पत्ते कट होतात व कोणाला उमेदवारीची संधी मिळते, याची उत्सुकता वाढली आहे.

२००४ मध्ये पक्षाचे तुकाराम गडाख निवडून आल्यानंतर २००९ पासून मागील १० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला नगर लोकसभा मतदारसंघ या वेळी मिळवायचाच, या हेतूने जोरदार हालचाली राष्ट्रवादीत सुरू आहेत. 

औरंगाबादच्या मेळाव्यानंतर वेळात वेळ काढून अजित पवारांनी तब्बल दोन-तीन तास नगरला थांबणे पसंत केले, तर रामनाथ वाघ कृतज्ञता सोहळ्यानिमित्त आलेले शरद पवार यांनीही नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधून नगरची राजकीय स्थिती जाणून घेतली. 

उमेदवारीसाठी ही पाच नावे चर्चेत.
लोकसभेसाठी माजी आमदार दादा कळमकर, प्रताप ढाकणे, नरेंद्र घुले,प्रशांत गडाख  आणि आ.अरुण जगताप ही पाच नावे चर्चेत आहेत त्यामुळे या उमेदवारीच्या लढतीत कोण बाजी मारतो, याची उत्सुकता पक्षात आहे. येत्या रविवारी (७ ऑक्टोबर) पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांना मुंबईत बोलावले आहे. नगरची जागा राष्ट्रवादीनेच लढवायचे जवळपास निश्चित झाले आहे. तरीही शिर्डी मतदारसंघातील पक्ष स्थितीचाही यानिमित्ताने आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.