मुंडेच्या दौऱ्यानंतर खा. गांधीविरुद्ध आ. राजळे समर्थकांत संघर्ष !


ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत खरवंडी कासार येथे झालेल्या ऊसतोडणी कामगारांच्या मेळाव्या निमित्ताने तालुक्‍यातील भाजप अंतर्गत जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर आ. मोनिका राजळे समर्थकांकडून मनमानी झाल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे पाथर्डी शहराध्यक्ष नागनाथ गर्जे यांनी केल्याने भाजपंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 

Loading...
आ.राजळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारे बहुतांश कार्यकर्ते खा. दिलीप गांधी समर्थक असल्याने आगामी काळात तालुक्‍यात खा. गांधीविरुद्ध आ. राजळे समर्थकांत संघर्ष होण्याचे संकेत मिळत आहेत.
तालुक्‍यात गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीला पंकजा यांनी राजळे यांना पक्षात घेऊन विधानसभेची उमेदवारी दिली. राजळे यांच्याबरोबर आलेल्या नवीन कार्यकर्त्यांची नाळ या जुन्या कार्यकर्त्यांबरोबर अजूनही जुळलेली नाही. आ. राजळे आम्हाला विश्वासात घेत नाहीत, असे आरोप करत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सध्या तरी खा.गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. 

पर्यायाने स्थानिक पातळीवर खा. गांधीविरुद्ध आ. राजळे समर्थक असे भाजपतच दोन गट निर्माण झाले आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने मात्र हा संघर्ष जाहीरपणे व्यक्त होताना दिसतो आहे. खरवंडी कासार येथे गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार व मुकादम संघटनेच्या वतीने पंकजा व खा. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी कामगार व मुकादमांचा मेळावा घेण्यात आला. 

या मेळाव्याच्या नियोजन बैठकापासूनच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद सुरू झाले. शासकीय विश्रामगृहावरील बैठकीत प्रत्यक्ष गटबाजीचा प्रत्यय आला. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांची तारीख घेताना आ. राजळे यांना विश्वासात घेतले नसल्याचे कळते. नियोजनाच्या बैठकीलाही आ.राजळे नसतील असे संकेत देण्यात येत होते; मात्र ऐनवेळी आ. राजळे विश्रामगृहावरील बैठकीला हजर झाल्याने मेळाव्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य गटबाजीला काहीसा पूर्णविराम मिळाला होता. 

त्यानंतर खरवंडी येथील मेळाव्यावर स्थानिक राजळे समर्थकांनी वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याने गटबाजीला पुन्हा वाव मिळाला. मेळावास्थळी व परिसरात मुंडे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. त्यातील आ. राजळे यांचा फोटो नसलेले काही फलक मेळाव्याच्या आदल्या रात्री फाडण्यात आले. राजळे समर्थकांनीच स्वागत फलक फाडल्याचा आरोप काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मेळावा परिसरातील फ्लेक्‍स फाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या राजकीय तणाव आयोजकांसाठी चांगलाच डोकेदुःखीचा ठरला.

गटबाजीचे प्रदर्शन व्यासपीठावर होऊ नये, यासाठी आयोजकांनी दोन्ही गटाच्या एका एका प्रतिनिधीची नेमणूक केली. वादावादी होऊ नये, म्हणून मुंडे येण्यापूर्वी कुणाचेच भाषण ठेवायचे नाही, असा निर्णय ऊस तोडणी संघटनेतील आयोजकांनी घेतला. गटबाजीमुळे प्रास्ताविक कोण करेल, आभार कोण मानेल व मुंडे यांचे स्वागत कोण करेल, व्यासपीठावर कुणाला संधी मिळेल, याची उत्सुकता होती. 

विशेष म्हणजे व्यासपीठावर कुणी बसायचे याच्याही दोन गटांच्या वेगवेगळ्या दोन याद्या तयार झाल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून व्यासपीठावरील माईकचे स्विच मुंडे येण्याच्या काही काळ अगोदर सुरू करण्यात आले. गटबाजीच्या वादात विनाकारण अपमान नको, म्हणून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यासपीठासमोरील खुर्च्यावर बसणे पसंत केले. तरीही आपापल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करण्याची व संधी मिळेल, तेव्हा विरोधी गटाला खच्ची करण्याची अतिउत्साही कार्यकर्त्यांनी संधी सोडली नाही. 

कुणाचे नाव घ्यायचे, कुणाचे टाळायचे याची तर जणू स्पर्धाच लागली होती. मुंडे यांचे व्यासपीठावर आगमन होताच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी व्यासपीठावर केलेल्या गर्दीने अक्षरशः तुडवातुडवी केली. शेवटी मुंडे यांच्या अंगरक्षकांना व्यासपीठावर जाऊन हस्तक्षेप करावा लागला. गटबाजीमुळे नियोजन कोलमडून मेळाव्याच्या उपस्थितीवर परिणाम झाल्याचे बोलले जाते. मेळावा संपला अन्‌ दाबून ठेवलेल्या गटबाजीने मुसंडी मारत डोके बाहेर काढले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.