खा. सदाशिव लोखंडेकडून सरकारला घरचा आहेर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठवाड्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी देत असाल, तर त्यास आमचा विरोध राहणार नाही. जर तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली मराठवाड्यातील दारूच्या कारखान्यांना पाणी देत असाल तर त्यास आमचा जरूर विरोध राहिल, असे शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी सरकारला ठणकावून सांगत आपल्यालाच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला.
Loading...

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी मुंडन आंदोलन केले. त्या आंदोलनात खा. सदाशिव लोखंडे सहभागी झाले होते. पत्रकारांशी बोलताना खा. लोखंडे म्हणाले की, ज्या शेतकर्‍यांना आपल्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, या हेतूने ब्रिटिश सरकारने भंडारदरा धरणाची निर्मिती केली, त्या भागातील शेतकर्‍यांना मारून जर तुम्ही मराठवाड्यासाठी पाणी देत असाल तर तो या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय आहे.

असा अन्यायकारक निर्णय सरकारने घेतला आहे. मी सत्ताधारी पक्षात असलो तरी खासदार या नात्याने मी या मतदारसंघातील शेतकर्‍यांबरोबर आहे. मराठवाड्यापेक्षा शिर्डी मतदार संघातील सहाही तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे जयकवाडीला पाणी जाताना प्रथमतः या भागातील बंधारे भरून शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.