श्रीगोंदा नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण जाहीर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जानेवारी २०१९ मध्ये होणाऱ्या श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहीर करण्यात आले. मुख्य नऊ प्रभाग आणि १९ पोट प्रभाग जाहीर केले असून , १९ पोट प्रभागांच्या आरक्षणाची सोडतही श्रीगोंदा-पारनेर भागाचे उपविभागीय अधिकारी श्री. गोविंद दाणेज यांनी काढली. जिल्हाधिकाऱ्यांनी सोडतीची वेळ सकाळी ११ वाजता जाहीर केलेली असताना सोडतीचा कार्यक्रम सकाळी सव्वा अकरा नंतर सुरु केला. 

नागरिकांनी विचारलेल्या शंकांची उत्तरे श्री. दाणेज यांनी दिली नाहीत, ती माझी जबाबदारी नाही अशी दुरुत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे नऊ प्रारूप प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. 

Loading...
त्यामध्ये भौगोलिक सलगता ठेवलेली नाही. रस्ते, ओढे, नाले यामुळे प्रभागाचे विभाजन होऊ नये अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असतांना त्या पाळलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती घेऊन सूचना करता येतील, त्याची मुदत १२ नोव्हेंबर २०१८ आहे. 

दत्तवाडी प्रभागात एक (अ) हा पोट प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी आणि एक (ब) हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे. लक्ष्मीनगर प्रभागात २ (अ) सर्वसाधारण महिलेसाठी आणि २ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे. औटेवाडी प्रभागात ३ (अ) अनुसूचित जाती व्यक्तीसाठी तर ३ (ब) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. शेख महंमद महाराज प्रभागात ४ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) साठी आणि ४ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे. 

गणेशनगर प्रभागात ५(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आणि ५ (ब) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. सावित्रीबाई फुले भाजी मंडई प्रभागात ६ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि ६ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे. सिद्धार्थ-ससाणेनगर प्रभागात ७ ( अ) अनुसूचित जाती महिलेसाठी आणि ७ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे. भैरवनाथ मंदिर प्रभागात ८(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि ८ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे.

साळवण देवी प्रभागात ९(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी , ९(ब) सर्वसाधारण महिलेसाठी आणि ९ (क) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. एकूण नऊ प्रभागात पहिल्या आठ प्रभागातून प्रत्येकी दोन आणि नवव्या प्रभागातून तीन असे १९ नगरसेवक निवडले जाणार आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी दादाराम औटी, भागचंद घोडके यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचे पत्ते कट झाले आहेत. 

मात्र ते त्यांच्या सौभाग्यवतींना उभे करू शकतात. सोडतीच्या वेळी प्रा. तुकाराम दरेकर, मनोहर पोटे, राजू गोरे, अख्तर शेख, बापू गोरे, संजय आनंदकर, फक्कड मोटे, जयश्री कोथिंबीरे, हरिभाऊ काळे, अशोक खेडके, एम.डी. शिंदे, सुनिल वाळके, दादाराम औटी, भागचंद घोडके आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वंभर दातीर यांनी उपविभागीय अधिकारी श्री. दाणेज यांना सहाय्यक म्हणून काम पाहिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.