धक्कादायक ! पाथर्डी तालुक्यात महिलांची संतापजनक विटंबना


शेकडो साड्या व महिलांची अंतर्वस्त्रे, काळ्या बाहुल्या, बिब्बे, लिंबू, दाभण आढळले. 

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी परिसरातील एका दरीत निर्जनस्थळी शेकडो साड्या व महिलांची अंतर्वस्त्रे आढळून आली आहेत. शिवाय जांभळाच्या झाडाच्या खोडावर अनेक काळ्या बाहुल्या, बिब्बे, लिंबू, दाभणासह ठोकलेल्या आहेत. अघोरीचा हा प्रकार उघडकीस आल्याने मढी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Loading...
असा धक्कादायक प्रकार कळल्यावर स्थानिक शेतकरी तेथे गेले गर्भगिरी परिसर हा दिव्य वनौषधीचा असून, पर्यावरणाची हानी होऊन, कपड्यांचा वन्यजीवांना त्रास होऊ नये, म्हणून जमतील तेवढ्या साड्या व अंतर्वस्त्रे गोळा केली असून या ठिकाणी भेट देऊन स्थानिक नागरिकांनी परिसर स्वच्छ केला.आहे,अजूनही काही कपडे विखुरले आहेत.

चैतन्य कानिफनाथ, चैतन्य मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी ज्या ठिकाणी साधना केली ते नाथकालीन सूर्यकुंड या डोंगरात आहे. या कुंडामध्ये कायम पाणी असते. परिसरातील जनावरे येथे तहान भागवण्यासाठी येतात. मढी, मायंबा, वृद्धेश्वर हा सर्व परिसर नाथपंथांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो.

या डोंगरदर्‍यांमध्ये अनेक गुहा, निर्जनस्थळे आहेत. काही ठिकाणी नाथांच्या वास्तव्याच्या श्रद्धेने तेथे तीर्थाचे महत्त्व आलेले आहे. मढी येथून मायंबाकडे जाताना सुमारे दोन किलोमीटरचा डांबरी रस्ता पार करून घाटाचा प्रारंभ होतो. तेथून उजव्या बाजूने या सूर्यकुंडाकडे पायवाट जाते.याठिकाणी असे अघोरी प्रकार चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी भेट दिली असता,हे सर्व आढळून आले.काही अघोरी भोंदू मांत्रिक चार-दोन शिष्य व भाविकांसह या ठिकाणी येतात. मांत्रिक सोबत आलेल्या भाविकांना टाचण्या, काळ्या बाहुल्या, दाभण, खिळे, बिब्बे, खिळ्याने झाडाच्या बुंध्यावर ठोकायला लावतो. जांभूळ झाडांनाच बाहुल्या इतक्या दाटीवाटीने ठोकलेल्या आहेत की, मूळ खोडाची सालही त्यामुळे दिसत नाही.

एखाद्याच्या नावाने चिठ्ठी तयार करून खिळा मारून ठेवणे, तीन धारी लिंबू, टाचणी, खिळे, दाभण व मोठ्या सुई आरपार करून लिंबू फांदीला अडकवणे, काळी बाहुली उलटी करून खिळा मारून हळद-कुंकू लावणे, फांदी घट्ट बांधणे, यासारख्या अनेक अघोरी विद्यांचा वापर होत असल्याने झाडांच्या फांद्या निकामी झाल्याचे आढळून आले आहे.

बाहेरगावाहून गाड्यांमधून महिला व दोन-चार पुरुष याठिकाणी येतात. या महिलांबरोबर त्यांच्या घरचे कोणीही नसतात. एजंटसारखा दिसणारा माणूस कुंडाजवळ जाऊन सर्वांना एकत्रित बोलवित सूचना देतो. त्यानंतर महिला अंगावरील सर्व वस्त्रे काढून स्नान करतात. तशा अवस्थेत पाण्याबाहेर येऊन वाळलेले कपडे घालतात.

त्यानंतर काळी बाहुली, लिंबू, दाभण, बिबे, असे साहित्य जांभूळाच्या झाडाला ठोकले जाते.नंतर अंगावरील कपडे मांत्रिक विधी करत असताना तेथेच सोडले जातात. आजही या परिसरात मोठ्या प्रमाणात साड्या व अंतर्वस्त्रे विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. अघोरीचा हा प्रकार उघडकीस आल्याने मढी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.