सुजित झावरे यांना धक्का,पारनेर राष्ट्रवादीतील समीकरणे बदलणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी भाळवणीचे माजी सरपंच बाबाजी तरटे यांची मंगळवारी निवड करण्यात आली. त्यांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नियुक्तीपत्र दिले. या वेळी माजी आमदार दादा कळमकर, मधुकर उचाळे, प्रशांत गायकवाड, दीपक पवार, विक्रम कळमकर, शंकर नगरे आदी उपस्थित होते. 


Loading...
पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. पक्षात दोन गट असून झावरे गटाचे दादासाहेब पठारे हे तालुकाध्यक्ष होते. आता तरटे यांची निवड झाल्याने हा झावरे यांना शह मानला जातो. 

बाजार समितीच्या निवडणुकीत झावरे यांनी आपल्याच पक्षाच्या सभापतींवर शिवसेनेच्या मदतीने अविश्वास ठराव आणला. त्यानंतर झावरे यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते दादा कळमकर, माजी जि. प. सदस्य मधुकर उचाळे, सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, दीपक पवार यांनी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. 


प्रशांत गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवर मूक संमती दर्शवली गेली. त्यामुळे त्यांनी अविश्वास ठराव परतावून लावत झावरेंना पहिला शह दिला. त्यानंतर ही दुसरी घटना अाहे. 


राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपद दुसऱ्या गटाच्या ताब्यात आल्यामुळे यापुढे राजकीय समीकरणे बदलणार अाहेत. तरटे हे मधुकर उचाळे-प्रशांत गायकवाड यांच्या गटात आहेत. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे यांच्या वाढदिवशी तरटे यांची निवड झाली. याचा अर्थ दुसऱ्या गटाला वळसे यांनी राजकीय ताकद दिली. 


बाजार समितीत झालेल्या घडामोडीत झावरे यांना वळसे गटाने मात दिली होती. झावरे यांनी पक्षशिस्त मोडली म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. पण त्यांनी नोटिशीला उत्तर दिले नव्हते. झावरे यांना राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सर्वाधिकार होते, पण आता त्यांना डावलून ही निवड झाली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.