सर्वात बोगस खासदार नगर दक्षिणला मिळाला - डॉ.सुजय विखे पाटील.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  माझ्या आजोबांनी दक्षिणेत इतिहास घडवला होता त्या इतिहासाची पुनरावृत्ती मी करणार असून. मी जिंकण्यासाठीच निवडणूक लढणार आहे, कुणाला पाडण्यासाठी नाही. सर्वात बोगस खासदार नगर दक्षिणला मिळाला आहे. सभामंडपाच्या कामात १० टक्के घेऊन मंजुरी दिली जाते. पाच-पाच वर्षे खासदार गावांना भेट देत नाहीत, अशी घणाघाती टीका सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यात बोलताना केली.

Loading...
काँग्रेस माझ्या रक्तातच आहे. भाजप हा आमचा नंबर १ चा शत्रू आहे. माझा पक्ष म्हणून मी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणार आहे, पण पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पक्ष, चिन्ह यांचे जोखड झुगारून पुढे जावे लागेल, असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

एकदा संधी द्या, २५ वर्षे तुम्हाला विकासकामांसाठी कोणाच्या दरवाजात जाण्याची वेळ येणार नाही. माझ्या मंचावर उघडपणे येणारेच माझे आहेत, आतून पाठिंबा देणारे टक्केवारीवाले असतात, असा टोलाही त्यांनी मारला. जि. प. सदस्य अनिता हराळ यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी खडकी येथे डॉ. विखे बोलत होते.

डॉ. विखे म्हणाले, भाजप हा कधीच शेतकऱ्यांचा पक्ष नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांविषयी कोणी बोलत नाही. येथील लोकप्रतिनिधींनाही शेतीतले काहीही माहीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख त्यांना कसे कळणार. येणारा काळ कठीण आहे. टँकर कोठून भरायचे असा प्रश्न निर्माण होणार आहे.

पाणी योजना वाढत्या वीजबिलांमुळे अडचणीत आल्या आहेत. सौरऊर्जा हाच आता पाणी योजनांसाठी आधार असणार आहे. कर्जमाफी अटी-शर्तीत अडकली, तशा आता जनावरांच्या छावण्यांसाठी अटी-शर्ती लावल्या जातील. जनावरांच्या शेणाचे परीक्षण करण्याची वेळ येईल. त्यावरून चारा कोणता दिला हे पाहिले जाईल आणि मगच बिल दिले जाईल, असा टोला त्यांनी मारला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.