अतिक्रमण केलेल्या उपसरपंचाचे पद रद्द


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणार्‍या नगर तालुक्यातील वडगांव गुप्ता ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपचे नेते श्यामराव पिंपळे यांच्या पत्नी सारिका पिंपळे यांची मागील एक महिन्यापूर्वी निवड झाली होती. मात्र श्यामराव पिंपळे व सारिका पिंपळे यांनी वडगांव गुप्ता येथील शासकीय जमिनीत राहत्या घराचे अतिक्रमण केले असल्याची तक्रार वडगांव गुप्ता येथील विरोधी पॅनलचे गोरक्षनाथ सातपुते व इतर ग्रामस्थांनी अ‍ॅड.एल.के. गोरे यांच्या मार्फत केली होती. 


Loading...
याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट करीत सारिका पिंपळे यांचे उपसरपंच पद रद्द केले. या प्रकरणात सरपंच पदाचे विरोधी उमेदवार गणेश गीते यांनी पाठपुरावा केला होता. श्यामराव पिंपळे व सारिका पिंपळे यांनी वडगांव गुप्ता मधील शासकीय जमिनीत राहत्या घराचे अतिक्रमण केले आहे. सदर निकाल नुकताच गुरुवार दि.25 ऑक्टोबर रोजी निकाली काढण्यात आला. 

या निकालाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालाची चर्चा संपुर्ण नगर तालुक्यात रंगली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेल्या अजून काही सदस्यांनी वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. त्यांचीही तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून, त्यावर सुनावणी होऊन निकाल राखून ठेवण्यात आला आहे. 

तर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी खोटा जातीचा दाखला वापरून सरपंच पद घेतले आहे. या जातीच्या दाखल्याची तक्रार अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. या दोन्ही प्रकरणाचे निकाल काही दिवसांत येण्याची शक्यता असून, संपुर्ण नगर तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागून आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.