आ.कर्डिलेंमुळे आ.राहुल जगताप यांना झाला हा 'तोटा'


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदा तालुक्‍यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या वक्‍तव्याचा फटका राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांना बसला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना चांगलीच समज दिली आहे. 
Loading...

भाजप आमदार कार्यक्रमाला कसे बोलविले व पक्षाध्यक्षांचा अवमान आपण कसा सहन केला? याचे उत्तर आ. जगताप यांना मागितले. परंतू त्यांना ते देता आले नाही. पुन्हा कसे होणार नाही त्याची काळजी घ्या, असे सांगण्यात आले आहे. आ. जगतापांना दुसऱ्यांदा समज देण्याची वेळ पक्षावर आली आहे. 


कारखानास्थवर झालेल्या कार्यक्रमात आ. कर्डिले यांच्या हस्ते अग्निप्रदिपन करण्यात आले. त्यावेळी आ. कर्डिले यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते की, “शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात. तसा त्यांचा इतिहास आहे. 


अरुणकाका जगताप यांचे नाव त्यांनी लोकसभेसाठी पुढे केले आहे. पण, कॉंग्रेसला भोकाडी दाखविण्यासाठी त्यांनी ही खेळी केली आहे.पवारांनी शब्द खरा केला तर भाजपचा राजीनामा देवून जगतापांचे काम करण्याची तयारी आहे, अशा शब्दात आ. कर्डिले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची खिल्ली उडविली. 


एवढ्यावर आ.कर्डिले थांबले नाही तर “आमदार राहुल जगताप यांचे पितृछत्र हरपले आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना ताकद द्या. मी तर आहेच मागे पण श्रीगोंदेकर लयभारी. काय करतील भरवसा नाही. ऐनवेळी परिस्थिती बदलली तर आमदार राहुल जगताप यांना भाजपची उमेदवारी घ्यावी लागेल,अशी गुगली यावेळी त्यांनी टाकली. 


विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आ. राहुल जगताप यांच्यासमोर हे भाषण झाले तरी आ. जगताप यांनी त्यावर गप्प बसण्याची भूमिका घेतली. लोकसभेला अरूणकाकांना श्रीगोंद्यातून सर्वाधिक मताधिक्‍क्‍या देवून विधानसभेला पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणला जाईल, असे आ. जगताप त्यावेळी म्हणाले होते.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.