सुजय विखे पाटलांचा हट्ट होणार पुरा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक शनिवारी रात्री मुंबईत पार पडली. या बैठकीत समविचारी पक्षांना आघाडीत सामील करून घेण्याबरोबरच मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. सोबतच काही जागा अदला-बदल करण्याबाबतही चर्चा झाली.
Loading...

यात प्रामुख्याने दक्षिण अहमदनगर आणि पुणे लोकसभा मतदारसंघ अदला-बदल करण्याबाबत एकमत होण्याची शक्यता झाली आहे. दक्षिण अहमदनगर जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र तेथे मागील चारपैकी तीन निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडावी असा आग्रह काँग्रेस नेत्यांनी धरला आहे. 

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला तर त्यावर विचार करू, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत मांडल्याचे कळते. दक्षिण अहमदनगरमध्ये मागील चार लोकसभा निवडणुकीपैकी फक्त एकदाच राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे तर तीनदा भाजपने बाजी मारली आहे. १९९९, २००९ आणि २०१४ मध्ये भाजपकडून दिलीप गांधी लोकसभेवर निवडून गेले आहेत. 


२००४ साली तुकाराम गडाख राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. त्याआधी या मतदारसंघाचे नेतृत्त्व बाळासाहेब विखे- पाटील यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ही जागा आघाडीला जिंकायची झाल्यास काँग्रेस व खासकरून विखे-पाटलांच्या घरात उमेदवारी दिल्यास ही जागा जिंकू असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी ठेवली आहे. मागील दोन-तीन वर्षापासून ते मतदारसंघाची बांधणी करत आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटलांनी आपल्या मुलाचा हट्ट पुरविण्यासाठी या जागेची मागणी केली आहे. विखे-पाटील हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गटाचे मानले जातात. त्यामुळे त्यांनीही यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आता, राष्ट्रवादी ही जागा सोडणार का एवढाच प्रश्न बाकी आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.