टायर फुटल्याने कार आदळली झाडावर ,चालकासह ७ प्रवासी जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवाशाकडून श्रीरामपूरच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा (एमएच १७ एई १६२९) मागील टायर फुटल्याने ती झाडावर आदळली. या अपघातात चालकासह ७ प्रवासी जखमी झाले. टाकळीभान शिवारातील हॉटेल द्वारकाजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली. 


Loading...
हॉटेलच्या फलकावर आदळून कार बाजूच्या झाडावर जोराने आदळली. जखमींपैकी एक महिला अत्यवस्थ असल्याने तिला लोणी येथील प्रवरा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकासह सहा प्रवासी साखर कामगार रुग्णालयात उपचार घेत आहेत. कार नेवाशाकडून श्रीरामपूरकडे जात होती. 

अमोल रवींद्र बागुल (वय २३), सपना अमोल बागुल (२१, दोघे चाळीसगाव), अादित्य संदीप नरोडे (७), सुमनबाई बाबुराव नरोडे (४५), सविता रतन जाधव (३२), आकाश रतन जाधव (२०) व चालक संतोष रतन जाधव (२२, सर्व अशोकनगर, ता. श्रीरामपूर) हे औरंगाबाद येथून देवदर्शन करुन घरी परतत होते. 


टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. हॉटेलचालक अविनाश वाघुले, वसंत वाकडे, अण्णासाहेब रणनवरे, संतोष वाघुले, देविदास बनकर, लाजरस रणनवरे, आरिफ शेख, कचू गोड यांनी तातडीने प्रवाशांना बाहेर काढले. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. उन्मेश लोंढे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना कामगार रुग्णालयात पाठवले.


सपना अमोल बागूल यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. टायर फुटल्याने कार वेडीवाकडी वळणे घेत असतानाच टाकळीभान येथील ग्रामसेवक राजेंद्र तगरे हे जैनपूर येथील कार्यालयात जात होते. कार अंगावर येत असल्याचे पाहून ते दुचाकीवरुन उडी मारत बाजुला पळाल्याने बचावले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.