एक्साईड बॅटरी कंपनीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चारशे कंत्राटी कामगारांना सेवेत सामाऊन घेण्याचे उच्च न्यायालयास प्रतिज्ञापत्र सादर करुन त्याची अंमलबजावणी न करता न्यायालयाचा अवमान करणार्‍या व कामगारांना आरोग्य सुरक्षिततेसाठी सुविधा न पुरविणार्‍या एक्साईड बॅटरी ई- 5 या कंपनीवर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर निदर्शने करण्यात आले. 


सदर प्रश्‍नी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली असता, पाटणकर यांनी मंगळवार दि.30 ऑक्टोबर रोजी कंपनी प्रशासनासह संयुक्त बैठक घेऊन प्रश्‍न समन्वयाने सोडविण्याचे आश्‍वासन दिले. या आंदोलनात मनसे कामगार सेनेचे चिटणीस चंद्रकांत ढवळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, परेश पुरोहित, नगर तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, संकेत सोमवंशी, रामनाथ डुकरे, बाळू सहाने, अभिषेक साळुंके, अविनाश क्षेत्रे, सचिन आंबेकर, सुनील वाठोळे, सचिन वाठोळे आदी सहभागी झाले होते.
Loading...

अहमदनगर एमआयडीसी येथील एक्साईड बॅटरी ई-5 या कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने उच्च न्यायालयात कंत्राटी कामगारांना सेवेत सामाऊन घेण्यासाठी रिट पिटीशन दाखल केली होती. कंपनी व त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र सादर करून सन 2011 ते 2016 च्या दरम्यान काळातील कंत्राटी पद्धतीने उत्पादन प्रक्रियेत काम करणार्‍या चारशे कामगारांना कंपनीत सामावून घेण्याचे कबूल केले होते. 

यामुळे सदर रिट पिटीशन फेटाळण्यात आली. मात्र कंपनीने आजतागायत सन 2018 पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना सेवेत घेतले नसून, कामगारांची फसवणुक केली आहे. कंपनीत कायम कामगारांची संख्या फक्त 265 असून, कंपनीने 135 कामगारांना सेवेत घेतलेले नाही. कंपनीत कंत्राटी पद्धतीने उत्पादन प्रक्रियेत काम करणार्‍या कामगारांची संख्या 800 पेक्षा जास्त असल्याचा आरोप कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

तर एक्साईड बॅटरी या कंपनीस कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याविषयी उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय (फॅक्टरी इन्स्पेक्टर) पाठीशी घालत आहे. कंपनीत सुरक्षेविषयी कोणत्याही प्रकारचे संरक्षण कामगारांना देण्यात येत नाही. वास्तविक पाहता कामगारांना सुरक्षा व आरोग्यासाठी हॅण्ड ग्लोज, रबर हॅण्ड ग्लोज, चष्मा, बुट व कॉटन टोपी आदी साहित्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. 

मात्र याची अंमलबजावणी होत नाही. सदर कंपनी हजार्डस मध्ये असल्याने येथील कर्मचार्‍यांना हजार्डसचा भत्ता मिळणे आवश्यक असताना तेही दिले जात नाही. आरोग्यविषयी सुरक्षा न पुरवल्यामुळे सदर कारखान्यातील कामगारांना अनेक धोके निर्माण झाले आहेत. 

सदर कामगारांच्या रक्तात मोठ्या प्रमाणात सिशे सापडले संबंधित कामगारांना भविष्यात जॉइंट पेन, अस्थमा, किडनी व त्वचा विकार यांसारख्या गंभीर आजारांना तोंड देण्याची समस्या उद्भवणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. उच्च न्यायालयासह कामगारांची फसवणुक करणार्‍या सदर कंपनीवर भादवि 420 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.