नगर व नाशिक जिल्ह्यांसाठी ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र धरण बांधण्यात येणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नाशिक व नगर जिल्ह्यांतून जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन जो संघर्ष पेटला अाहे, त्यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून नाशिक व नगरसाठी ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र धरण बांधण्यात येणार असून समुद्रात जाणारे पाणी अडवून नवीन धरण उभारले जाईल. या धरणासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च होणार असून त्यात ९० टक्के वाटा केंद्र सरकार तर १० टक्के राज्य सरकारचा असेल. 
Loading...

या धरणातील पाणी नाशिक व नगरला आणले जाईल. त्यामुळे नाशिकचा पाणी प्रश्न सुटेल तसेच नाशिक व नगरच्या धरणांतील पाणी पुढे जायकवाडीला सोडण्याचा मार्गही मोकळा होईल. या नवीन धरणाबरोबरच नार-पार- तापी आणि दमणगंगा-पिंजाळ या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र व गुजरात सरकारमध्ये पाणी वाटपाबाबत करार करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 


के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कर्मयोगी व कृषी तपस्वी या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, आपल्या देशात भरपूर पाणी उपलब्ध आहे. सुमारे तीन हजार टीएमसी पाणी वाहून जाते, जे उपयोगात येत नाही. 
हे पाणी उपयोगात आणण्यासाठी हिमाचल व उत्तराखंड येथील सहा योजनांपैकी पाच प्रकल्प सुरु झाले असून त्यामुळे ७०० टीएमसी पाणी गंगा, यमुना या नद्यांद्वारे उपयोगात येईल. त्यामुळे राज्याराज्यांमध्ये सुरु असलेला पाणी वादही मिटू शकेल. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.