नगर शहर शिवसेनेला बसणार दुसरा मोठा धक्का ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सेनेच्या बालेकिल्ल्यात नगरसेवक असलेल्या दोघा शिलेदारांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाने शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल लोखंडे व नितीन जगताप यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असून, त्यांची उमेदवारीही निश्‍चित असल्याचे सांगण्यात येते,या ‘आऊटगोईंग’ने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

Loading...
शिवसेना व भाजपकडून ‘इनकमिंग सुरू असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपले ‘छुपे पत्ते’ उघडण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय चोपडा यांचा प्रवेश करून राष्ट्रवादीने सेनेला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर, आता दोन शिलेदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत. प्रवेशाबाबत त्यांची सध्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाबरोबर चर्चा सुरू आहे. 

प्रभागनिहाय मतदारयादी जाहीर झाल्यानंतर या दोघांचा राष्ट्रवादी प्रवेश होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे दोघे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागातील नगरसेवक आहेत. एका शिलेदाराची पत्नी विद्यमान नगरसेविका असून त्यांनी मनपात महत्वाचे पद भूषविले आहे. 

तर दुसर्‍या शिलेदारानेही मनपातील महत्वाच्या पदावर काम केले आहे तसेच हा शिलेदार नेहमी मनपाच्या महासभेत विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी आग्रस्थानी राहिला. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेमुळे हे दोघे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. 

दरम्यान, दत्ता कावरे यांनी भाजपला ‘जय श्रीराम’ करीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे माळीवाडा भागात भाजपकडे प्रभावी उमेदवार राहिला नव्हता. त्यामुळे भाजपकडून ‘तगड्या’ उमेदवाराची शोधाशोध सुरू होती. अखेर, शिवसेनेचे माजी नगरसेवक व माजी आमदार अनिल राठोड यांचे खंदेसमर्थक अनिल लोखंडे यांनी भाजपतील प्रवेश निश्‍चित केला आहे. त्यांच्यासह माजी नगरसेवक नितीन जगताप यांचाही येत्या दि.30 ला भाजपत प्रवेश होणार असल्याचे समजते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.