बसमध्ये श्रीरामपूरच्या पाकिटमार महिलांना रंगेहाथ पकडले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर येथील दोन चोर महिलांना राहुरी तालूका पोलिस ठाणे हद्दीत प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली. याबाबत उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंदखेडा-पुणे बस क्रमांक एम.एच. २० बी. एल ३४१४ ही दि.२० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजे दरम्यान बाभळेश्वर बस स्थानकात आली होती. या ठिकाणी एक महिला एका छोट्या मुलांसह बसमध्ये बसली. बस कोल्हार बसस्थानकात आली असता दुसरी एक महिला बसमध्ये बसली. 

यावेळी राजेंद्र दामोधर काळे, रा.गांधी चौक, संगमनेर हेही बसमध्ये प्रवास करत होते. बाभळेश्वर येथून बसलेल्या महिलेने राहुरी तालुक्यातील कोल्हार दरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेऊन धक्काबुक्की करत राजेंद्र काळे यांच्या खिशातील सुमारे एक लाख रूपये चोरण्याचा प्रयत्न केला. 


सदर घटना काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलेला नोटांसह रंगेहाथ पकडले. तर सदर महिलेच्या हातून नोटा परत घेताना दोन हजारच्या काही नोटा फाटल्या. यावेळी कोल्हार येथून बसलेल्या दुसऱ्या महिलेने मुलाला उलटी होत आहे, बस थांबवा असे म्हणून बसमध्येच धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील काही प्रवाशी महिलांनी त्या दोन महिलांना चांगलाच चोप दिला. व बस राहुरी बसस्थानकात आणून थांबविली. 


यावेळी सदर महिलांनी प्रवासी व पोलिसांसमोर गयावया करून सोडून देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेले.या घटनेबाबत राहुरी पोलिसांत दुपारी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर सदर महिला या श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचे समजले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.