जिल्हातील प्रस्थापितांच्या विरोधात निलेश लंकेचा नवा पक्ष !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या विरोधात तालुक्यानिहाय आघाडीची जुळणी पूर्ण होत आली असून आघाडीची घोषणा झाल्यावर भल्याभल्यांच्या बत्या गूल होतील, असे सांगत शिवसेनेचे बंडखोर नेते नीलेश लंके यांनी जिल्ह्यातील राजकारणात सर्व पक्षांतील नाराजांना एकत्र घेत वेगळी चूल पेटवणार असल्याचे जाहीर केले. 
Loading...

जवखेडे येथे भगवान गॅस एजन्सीमार्फत उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल झावरे, उपसरपंच उत्तम कासार, सरपंच अमोल वाघ, पोपट आंधळे, इरफान पठाण, उद्धव मनकर, विजय भोसले, सुरेश आंधळे आदी उपस्थित होते. 

भाजपतर्फे उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न असलेले अमोल गर्जे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती समजले जातात. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून डावलले गेल्यानंतर गर्जे व आमदार मोनिका राजळे यांच्या गटात शीतयुद्ध सुरू झाले. त्यातूनच तालुक्यात पक्षांतर्गत नव्या-जुन्यांचा वाद रंगला. 

पक्षाला नाराजांची ताकद दाखवून देण्याचा चंग गर्जे गटाने बांधून पक्षशिस्तीचा फारसा विचार न करता विधानसभेची निवडणूक लक्ष्य म्हणून जाहीर केले. लंके यांनी समविचारी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला. 

कर्जत, जामखेड, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांचा भाषणातून उल्लेख करत आमची आघाडी झाली आहे, तुम्ही सामील व्हा, सर्व प्रकारे ताकद देऊ, असे म्हणत त्यांनी गर्जे यांना पाठबळ दिले. 

.....तर जनता डोक्यावर घेते !
लंके म्हणाले, प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवा, जनता डोक्यावर घेते. रस्ते, बंधारे व सभामंडपाची सरकारी निधीचे कामे दाखवणे म्हणजे विकास असेल, तर नेते स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम करणारा लोकमानसात चमकतो. जनता पाठीशी असल्यावर पक्षाची फारशी गरज उरत नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.