श्री साई समाधी शताब्‍दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्री साई समाधी शताब्‍दी सोहळा समारोप कार्यक्रमानिमित्‍त दिनांक 19 ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी घेतला. शिर्डी करांच्‍या तसेच देशाच्‍या दृष्‍टीने हा सोहळा ऐतिहासिक असून त्‍यासाठी सर्वांनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन त्‍यांनी केले.
Loading...

श्री साई मंदिर परिसरातील बैठक कक्षात पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी साई समाधी शताब्‍दी सोहळा समाप्‍ती कार्यक्रम तयारीबाबत आढावा घेतला. यावेळी साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्‍यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत साई समाधी शताब्‍दी सोहळयाच्‍या समारोप कार्यक्रमासोबतच पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्‍या लाभार्थ्‍यांला घरकुल लोकार्पणाचाही कार्यक्रम होणार आहे. साई समाधी शताब्‍दी वर्षात देशाचे राष्‍ट्रपती, उपराष्‍ट्रपती शिर्डीत येवून गेले आहेत व सोहळयाच्‍या समारोपाला पंतप्रधान येत आहेत हा सोहळा यशस्‍वी करण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपल्‍याकडे असलेली जबाबदारी व्‍यवस्थित पार पाडावी, अशा सूचनाही त्‍यांनी सबंधितांना दिल्‍या.

पंतप्रधान झाल्यानंतर श्री. मोदी प्रथमच शिर्डी येथे येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावेळी सर्व यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी पुरेशा गांभीर्याने पार पाडणे आवश्यक आहे. शिर्डी विकासासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यावेळी या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे हा दौरा शिर्डीकरांसाठी, जिल्ह्यासाठी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

19 ऑक्‍टोबर रोजी होणा-या या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, त्‍यामुळे आपण सर्व मिळून हा कार्यक्रम यशस्‍वी करू,असे आवाहन त्‍यांनी केले.बैठकीपूर्वी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी साईमंदीर परिसरातील ध्‍वजारोहण स्‍थळ तसेच येथील कार्यक्रम स्‍थळासोबतच पंतप्रधान भेट देणार असलेल्या संभाव्य कार्यक्रम स्‍थळांचीही पाहणी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.