मागासवर्गीयांना हीन वागणूक देणार्‍या एमआयडीसीच्या पोलिस अधिकार्‍यावर कारवाईची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागासवर्गीय समाजातील पिडीतांना हीन वागणूक देणार्‍या एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी तथागत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आले असून, सदर कारवाई न झाल्यास मागासवर्गीय पिडीतांच्या कुटुंबीयांसमवेत उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सपोनि विनोद चव्हाण हे जातीयवादी विचारसरणीतून काम करीत आहे. मागासवर्गीयांचा त्यांना नेहमीच तिरस्कार राहिलेला आहे. पोलीस स्टेशनला आपले गार्‍हाणे मांडण्यासाठी आलेल्या मागासवर्गीय पिडीतांना त्यांनी हीन वागणूक दिलेली आहे. याविरोधात प्रत्येक वेळेस मागासवर्गीय संघटनांनी व कार्यकर्त्यांनी त्यांची तक्रार केलेली आहे. मात्र त्यांच्यावर अद्यापि कारवाई झालेली नाही.

चव्हाण एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून मागासवर्गीयांवर अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे.काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या भाकरे नामक कर्मचार्‍याला काही लोकांनी त्रास दिला म्हणून त्याने आत्महत्या केली. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी तो व त्याचे कुटुंबीय सपोनि चव्हाण यांच्याकडे संबंधितांविरुद्ध तक्रार करण्यास गेले होते.चव्हाण यांनी त्यांचे काही ऐकून न घेता दमदाटी करून पोलिस स्टेशनमधून हाकलून लावले. याचा मनस्ताप होऊन भाकरे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

तसेच नागापूर येथील एका दलित महिलेस काही लोकांनी मारहाण केली म्हणून ती देखील तक्रार देण्यास गेली असता, तीची तक्रार नोंदवून न घेता तीला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सदर महिला चव्हाण यांच्यावर कारवाई होण्यासाठी उपोषणाला बसली होती. 

रामवाडी येथील साबळे व घाटविसावे या मागासवर्गीय कुटुंबातील मुलांवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आडून दमबाजी करून शिवीगाळ करीत जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती. व्यक्तिगत दुश्मनी काढण्यासाठी साबळे व घाटविसावे कुटुंबांना खोटे जबाब देण्यासाठी ते दबाव आनत होते. या प्रकरणी साबळे व घाटविसावे या कुटुंबीयांनी देखील सपोनि चव्हाण यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
चव्हाण यांना शहर व परिसरात नेमणूक मिळाल्यापासून पाच वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. नियमानुसार त्यांची बदली होणे गरजेचे होते परंतु वरिष्ठांच्या मेहरबानीमुळे त्यांची बदली झालेली नाही. मागासवर्गीय समाजातील पिडीतांना हीन वागणूक देणार्‍या एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशांत म्हस्के यांची स्वाक्षरी आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.