पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून साई दरबारात जनतेच्या डोळ्यात धुळफेक !अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंतप्रधान आवास योजनेची घोषणा करुन चार वर्ष उलटल्यानंतर गृहनिर्माण मंडळ स्थापन करण्याची जाग आलेल्या सत्ताधारी भाजप सरकार 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घरकुल वंचितांची फसवणुक करीत आहे. तर शिर्डी येथे ई गृहप्रवेश प्रकल्पाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी साई दरबारात जनतेच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप करीत मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे. 

Loading...
 
घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी संघटनेने साडेचार वर्षे आंदोलने केली. हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला आग्रह धरण्यात आला. मात्र सत्ताधार्‍यांनी या मागणीला प्रतिसाद दिला नाही. संघटनेच्या वतीने पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री व म्हाडा कार्यालयाशी वारंवार संपर्क साधून आवास योजना कार्यान्वीत करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने याबाबत शासन निर्णय देखील काढला नाही. तीन वर्षानंतर पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत होत नसल्याने ती म्हाडा कडे वर्ग करण्यात आली.

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या विभागाकडून घरकुल वंचितांची घरे होण्याची अपेक्षा नव्हती. नंतर राज्य सरकारने संयुक्त भागीदारी योजना अंमलात आनली. या योजनेचा प्रचार प्रसार न केल्याने शेतकर्‍यांनी याला प्रतिसाद दिला नाही. आवास योजना कार्यान्वीत न करता सत्ताधारी भाजप सरकारने फक्त घोषणांच्या कवड्या रेवड्या वाटल्या. सहा महिन्यावर निवडणुका आल्याने सत्ताधार्‍यांना गृहनिर्माण मंडळ स्थापन करण्याची जाग आली आहे. पुढील निवडणुकीचे लक्ष्य ठेऊन सत्ताधारी घरकुल वंचितांना गाजर दाखवित असल्याचा आरोप प्रसिध्दी पत्रकात संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

महापालिकेत शहरातील 11 हजार घरकुल वंचितांची यादी पडून आहे. मात्र एकही घरकुल अद्यापि झालेला नाही. ग्रामीण भागात इंदिरा आवास योजनेतंर्गत पूर्वीच्या सरकारने तयार केलेल्या याद्याच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना दाखवून सत्ताधार्‍यांनी ई गृहप्रवेश प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे. सदर कार्यक्रमाला भाविकांसह कार्यकर्ते जमा करण्यासाठी सरकारी खर्चातून कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी 5 जिल्ह्यातून आठशे एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

निवडणुकीपुर्वी सदर योजना राबवली न गेल्यास सर्व घरकुल वंचित भाजप विरोधात मतदान करणार असल्याचा इशारा घरकुल वंचितांचे नेते अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिला आहे. घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी न लावता, कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करुन ई गृहप्रवेश प्रकल्पाचा शुभारंभ केल्याचा निषेध अ‍ॅड.गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, प्रकाश थोरात, अंबादास दरेकर, अंबिका नागुल, सखुबाई बोरगे यांनी केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.