श्रीगोंद्यात पाठलाग करणाऱ्या तरुणांवर दरोडेखोरांचा गोळीबार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची घटना तालुक्‍यातील लोणीव्यंकनाथ येथे नगर-दौंड रस्त्यावर रस्त्यावर घडली. ही घटना सोमवारी (दि.15) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. 

Loading...
पोलिसांनी मंगळवारी दुपारी लोणीव्यंकनाथ परिसरात चोरीच्या साहित्याची बॅग आणि गॅस सिलेंडर सापडल्याने या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी साहित्य ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, की लोणीव्यंकनाथ येथील तरुणांना सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास स्टेट बॅंकेच्या शाखेजवळ दोन जण दिसले. 

त्या दोघांच्या हालचाली संशयित वाटल्याने गावातील तरुणांनी फोन करून काही सहकाऱ्यांना बोलवून घेतले. गावातील तरुणांना पाहताच त्या संशयितांनी नगर-दौंड रस्त्याने पळायला सुरुवात केली. गावातील तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला; मात्र या वेळी संशयितांनी गावातील तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. 

गोळीबार झाल्याने गावातील तरुण घाबरले आणि त्याचवेळी आरोपी जवळच असणाऱ्या नाल्यातून खाली उतरले. गोळीबार झाल्याने घाबरलेल्या गावातील तरुणांनी घडलेल्या प्रकाराची कोणालाही माहिती दिली नाही. मंगळवारी सकाळी पारगाव सुद्रिक रस्त्याजवळ चोरीचे साहित्य असलेली एक बॅग आणि त्याच्या शेजारी गॅस सिलेंडर व कटर आढळून आले. यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली. 

चोरीचे साहित्य सापडल्याची वार्ता पसरल्यानंतर सोमवारी रात्री घडलेल्या घटनेचा तरुणांनी उलगडा केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना सहा मास्क, दोन कटावण्या, गॅस कटर, गॅस सिलेंडर आणि कटरचे चार ब्लेड आदी साहित्य सापडले. पोलिसांनी साहित्य जप्त केले असून पुढील चौकशी सुरू होती; मात्र या घटनेतील आरोपी लोणी व्यंकनाथ परिसरात बॅंक लुटण्यासाठी आले होते, की अन्य काही याबाबत मात्र उलगडा होऊ शकला नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.