तर आमदार कर्डिले राष्ट्रवादीत जाणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आ. अरुण जगताप यांच्या रूपाने काँग्रेसला भोकाडी दाखवली असली तरी पवार जे बोलतात ते करत नाही असा आजवरचा त्यांचा अनुभव आहे. आ. अरुण जगताप हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तर मी त्यांच्यासोबत आहे, असे सांगत आ. शिवाजी कर्डिले यांनी श्रीगोंद्याच्या मैदानात तुफान राजकीय फटकेबाजी करत कार्यकर्त्यामध्ये हास्यकल्लोळ निर्माण केला.कुकडी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी ते बोलत होते.
Loading...

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून आमदार अरुण जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचे संकेत मिळाल्याने त्यांचे व्याही आमदार शिवाजी कर्डिले यांची पावले राष्ट्रवादीच्या दिशेने पडण्याची शक्यता आहे. यावरून राजकिय चर्चांना उधाण आले असतांनाच कर्डिले यांनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर प्रचार करण्याचे जाहीर करुन खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संदर्भातील चर्चेला बळ मिळू लागले आहे.

आ. कर्डिले म्हणाले की, मी भाजपाचा आमदार असलो तरी आधी शेतकर्‍यांचा नेता आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना मदत करतो. म्हणून माझी मंत्रीपदाची संधी गेली. आता कुकडीला जादा मदत केल्याचा प्रचार करून माझे आमदारकीचे तिकीट कापू नका. तसा मी कुणाला घाबरत नाही. बापू, तात्यांनी साखर कारखाने चांगले चालविले. तुमच्यातील काही मंडळींनी मोठेपणासाठी मोठा कारखाना टाकला. त्याची काय परिस्थिती झाली, असे विचारत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर निशाणा साधला.

व्यासपीठावर मी वगळता सगळे एका पक्षाचे आहेत. भाजपा सरकारने शेतकर्‍यांना सर्वात जादा मदत केली. जिल्ह्यात बोंडअळीसाठी 35 कोटींची मदत केली. एकट्या श्रीगोंदा तालुक्यात अडीच कोटी रुपये मिळाले. आता साखर निर्यात टनामागे 1 हजार 100 रुपयेअनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉल इंधनामध्ये वापरण्यास परवानगी दिली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार येणार, असा विश्वास कर्डिलेंनी व्यक्त केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.