नगर शहर बदलायचे आहे की नाही हे ठरवण्यासाठी मनपा निवडणूक - खा. दिलीप गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शहर विकासाचा अजेंडा हा केवळ भारतीय जनता पक्षाकडेच असून जनमानस हे भाजपच्या पाठीशी आहे. जळगाव व सांगली महापालिकेत पक्षाने अभूतपूर्व यश संपादन केले असून विरोधकांच्या पारंपरिक गडात भाजपने सर्जिकल स्ट्राइक केले. त्याचीच पुनरावृत्ती नगर महापालिकेतही होणार असून नगरच्या महापालिकेत भाजपचाच झेंडा फडकणार. सावेडीतील राहुल वाकळे व गुलाब वाकळे यांच्या पक्षप्रवेशाला जमलेली ही गर्दी पाहता आगामी महापालिकेचा कल स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी केले. 
Loading...

सावेडीगावातील युवा नेते राहुल वाकळे व गुलाब वाकळे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महालक्ष्मी उद्यानाजवळ आयोजित भव्य कार्यक्रमात ना. शिंदे बोलत होते. 

यावेळी बोलताना खासदार दिलीप गांधी म्हणाले, भाजपाच्या सरकारच्या नेतृत्वाखाली देश- राज्य बदलत आहे. आपलं नगर शहर हे बदलायचे आहे की नाही हे ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे.आज या विराट सभेत माजी नगरसेवक स्वर्गीय वाकळे यांचे स्मरण होत आहे. ते माझ्याबरोबर नगरसेवक होते. महानगरपालिका ही सामान्यांच्या जीवनाची कामधेनू आहे. 

नगर शहर पुढे न्यायचे आहे. त्यासाठी विकासाचा अजेंडा.
प्रत्येक माणसाचे काम महापालिकेत असते. मात्र नगरच्या मनपाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे कोणतीच कामे होत नाहीत. एकहाती सत्ता दिल्यावर कसा विकास होतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विकास कामे करून दाखवून दिले आहे. त्याच धर्तीवर नगर शहर पुढे न्यायचे आहे. त्यासाठी विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही आलो आहोत. 

भुतकरवाडी परिसरात लवकरच पाचशे कोटी रुपयांचे सुसज्ज हॉस्पिटल !
या भुतकरवाडी परिसरात लवकरच पाचशे कोटी रुपयांचे व तीनशे बेड असलेले अद्यावत सुसज्ज हॉस्पिटल होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे व मी केलेल्या पाठपुराव्यामुळे हॉस्पिटल मंजूर झाले आहे. तसेच आयुष्य मंत्रालयाकडून केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनीही सिव्हील हॉस्पिटल मध्ये 100 बेडचे नवीन हॉस्पिटल मंजूर केले आहे. तसेच सरकारकडून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगर शहरात स्वच्छतेसाठी 28 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 

शहरातील उड्डाणपूल आता होणार ! 
विकासाच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी आम्ही करत आहोत. शहरातील उड्डाणपूल आता होणार असून सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. या उड्डाणपुलाचे श्रेय भाजपला मिळणार म्हणून केवळ स्वार्थापोटी सत्ताधारी शिवसेनेने मनपातील एन ओ सी चा ठराव बदलला. मंत्र्यालयात खरा प्रस्ताव त्यांनी पाठवला नाही, मात्र आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून मनापा हिस्याचे 52 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे, लवकरच त्याचे पत्र मिळणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.