बाबुर्डी बेंदच्या महिलांनी जाणून घेतली बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाची माहिती

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महिला आणि मुलींसाठींच्या विविध योजना तसेच बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्यासंदर्भातील माहिती नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील महिलांनी जाणून घेतली. छोट्याशा बचतीतून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा धडा आज या महिलांनी गिरवला.

बाबुर्डी बेंद येथे सीएसआरडीच्या समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने संवादपर्व या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, गावचे उपसरपंच अण्णासाहेब चोभे, राजाराम चोभे, ग्रामपंचायत सदस्य दयाबाई साळवे, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अश्विनी गायकवाड, प्रतीक्षा शिंदे, अविनाश गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. गायकवाड म्हणाले, बचत हा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वांत चांगला पर्याय आहे. बचतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊन महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वतंत्र निर्णयक्षमता आणि आर्थिक स्वातंत्र्य येते. त्यामुळे या स्वयंसहायता गटांचे खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. अगदी दहा रुपयांपासून आपण दरमहा बचत करु शकतो. महिलांनी पुढाकार घेतल्यास गावविकासालाही चालना मिळते, असे ते म्हणाले.

श्री. चव्हाण यांनी यावेळी शासकीय योजनांची माहिती करुन घेण्याचे आवाहन केले. शासनाच्या योजना या समाजातील प्रत्येक घटकांसाठी असतात. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी सकारात्मकरित्या योजनांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवली तर त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचेल. राज्य शासनाच्या लोकराज्य मासिकातून शासनाच्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचत असल्याचे ते म्हणाले.

लोकसहभाग, विविध शासकीय विभागांचा पुढाकार आणि प्रसारमाध्यमांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे योजनांची माहिती संबंधित घटकांपर्यंत पोहोचवण्यात यश येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपसरपंच श्री. चोभे यांनी, सर्वच शासकीय योजनांची अंमलबजावणी होईल, यासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम सुरु करणार असल्याचे सांगितले. योजनांच्या अंमलबजावणीत लोकसहभाग वाढेल, यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी अश्विनी गायकवाड यांनी केले. त्यांनी गावात कार्यानुभावाच्या काळात गावकऱ्यांकडून सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन गावकऱ्यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी उपस्थितांना लोकराज्य अंकांचे वितरण करण्यात आले.

सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे आणि पर्यवेक्षक प्रा. कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी बाबुर्डी बेंद येथे कार्यानुभव घेत असून त्याचाच एक भाग म्हणून लोकराज्य संवादपर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील महिलांची तसेच ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.