खा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चाणक्‍य अहवालाबाबत भाजपचे नेतेच संदिग्ध विधाने करीत असल्याने या अहवालाविषयीचे औत्सुक्‍य आणखीच वाढले आहे. पराभूत होणाऱ्यांत आपला, तर समावेश नाही ना, या चिंतेने नगर जिल्ह्यातील खासदार दिलीप गांधीना ग्रासले आहे. चाणक्‍यच्या अहवालाचा आधार घेत पक्षश्रेष्ठी आपला पत्ता तर कट करणार नाही ना, याची धास्ती खासदारांना लागली आहे.
Loading...

नवी दिल्ली येथील चाणक्‍य नावाची संस्था भाजपसाठी वारंवार सर्वेक्षण करीत असते. तिचे अहवाल अतिशय गोपनीय असतात. चाणक्‍य ही भाजपशी संबंधित संस्था आहे. तिचे अहवाल बऱ्याचदा खरे ठरले आहेत. आताही या चाचणीच्या अहवालाच्या आधारे भाजपच्या आठ खासदारांना व 40 आमदारांना पुन्हा निवडून येणे अवघड दिसते. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना तशी जाणीव करून दिल्याचे वृत्त पसरले. 

नगर जिल्ह्यात खा. दिलीप गांधी यांनी लोकसभेची उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून प्रचाराचा प्रारंभ सुरू केला आहे; परंतु चाणक्‍यच्या अहवालानुसार खा. गांधी यांनाही निवडणूक सोपी नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना लोकसभेऐवजी विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कदाचित त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांना पक्ष नगर विधानसभेची उमेदवारी देईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

नगर लोकसभेची जागा हातून जाऊ द्यायची नसेल, तर उमेदवार बदलण्याचा पर्याय पक्षाने ठेवला असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्याचे संपर्कमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव त्यादृष्टीने आघाडीवर आहे. या मतदारसंघातील इतर मागासवर्गीय मतदारांची संख्या लक्षात घेता आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले उमेदवार म्हणून प्रा. शिंदे यांचे नाव पुढे केले जात आहे. 

प्रा. शिंदे यांच्या स्वतः च्या कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांच्याविरोधात वाढत असलेली नाराजी आणि भाजपच्या काही नेत्यांनीच त्यांच्याविरोधात लढण्याची केलेली तयारी पाहता त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता दिसते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.