पुत्रप्रेमात भरकटलेल्या खासदारास सुज्ञ नगरकर जागा दाखवून देतील !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत भाजपने स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी फ्लेक्सच्या माध्यमातून शहराची बदनामी करण्यास सुरूवात केली आहे. यातून शहरात पथदिव्यांची सुविधा आजतागायत मनपाने पुरविली नसल्याचे व संपूर्ण शहर अंधारात असल्याचे भासविण्यात आले आहे. 
Loading...

भाजपकडून विकासकामे न झाल्याचे फ्लेक्स लावून शहराची बदनामी करायची आणि दुसरीकडे विकासकामे केल्याची पत्रके वाटून नगरकरांची दिशाभूल करायची, असा दुटप्पी प्रचार सुरू आहे. भाजपच्या नेत्याने व त्यांच्या मुलाने ठेकेदाराला पुरवठा केलेली चायनीज पथदिवे बंद पडल्यानेच शहरात अंधार पडल्याची कबुली भाजप देत आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केला. 


भाजपने शहरात वाटलेल्या पत्रकांमध्ये 12 मोठे हायमॅक्स, शंभरहून अधिक हायमॅक्स व एलईडी बसविल्याचा व त्यातून शहरात भाजपनेच विकासकामे केल्याचा प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे हेच शहरात फलक लावून शहर अंधारात आहे. शहरात पथदिवे नाहीत, असा प्रचार करीत आहेत. विशेष म्हणजे भाजपचे हे नेते नगर शहराचे अनेक वर्षापासून खासदार आहेत. 


मनपा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात उद्योगधंद्ये नाहीत. नोकर्‍या नाहीत. मनपात आमची सत्ता आली तर हे चित्र बदलेल असे गाजर दाखवित आहेत. मागील चार वर्षे फक्त घोषणा व गाजर वाटल्यामुळेच त्यांचा विकास वेडा झाल्याचे त्यांनी लावलेल्या फ्लेक्सवरून दिसून येत आहे. 


बेरोजगारी, उद्योगधंदे आणणे, त्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे हे काम खासदार, आमदारांचे असते, याचा विसर पुत्र प्रेमात भरकटलेल्या खासदारास पडला आहे. चार वर्षे छिंदमला घेऊन मुंबई वार्‍या करण्यातच त्यांचा वेळ गेला. त्यामुळे येत्या निवडणुकीत सुज्ञ नगरकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील व पंढरीच्या वारील पाठवतील, असा आरोप संभाजी कदम यांनी केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.