नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिस महासंचालकांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार असून पोलिस महासंचालकांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत.
Loading...

गिरवले यांच्या मृत्यू प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनी खंडपीठाकडे याचिकेद्वारे केली आहे. ही याचिका दाखल करून घेत पोलिस महासंचालकांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत.

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी (७ एप्रिल २०१८) आमदार संग्राम जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या वेळी जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी जगताप समर्थकांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता. 


त्यात गिरवले यांचाही समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व इतर १५ ते २० कर्मचाऱ्यांनी गिरवले यांना मध्यरात्री राहत्या घरातून मारहाण करत अटक केल्याचे याचिकेत म्हटले आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने गिरवले यांना कारागृहात रवाना करण्यात आले. 

मात्र, पोलिसांनी १० रोजी माळीवाडा भागात छापा टाकून फटाके, सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी गिरवले यांना पुन्हा अटक केली. पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी गिरवले यांना मारहाण केली. त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे पत्नी निर्मला यांनी याचिकेत म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.