शिवसेनेकडून घनश्‍याम शेलार यांची नगर लोकसभेची उमेदवारी निश्‍चित.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेना व भाजपची लोकसभा निवडणुकीत युती न होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून घनश्‍याम शेलार यांची नगर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्‍चित झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 21 तारखेला नगर येथे येत असून, त्याच वेळी ते शेलार यांची उमेदवारी जाहीर करणार आहेत. 

Loading...
लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वंच पक्षांनी युद्धपातळीवर सुरू केली आहे. या मतदारसंघातून दिलीप गांधी निवडून गेले आहेत. सर्वेक्षणाचे निष्कर्ष काहीही असले, तरी उमेदवारी आपल्याच मिळेल, असे गृहीत धरून त्यांनी स्वतः च्या प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी त्यांचे प्रचाररथ फिरत आहेत. 

खा. गांधी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मात्र आघाडी होण्याचे संकेत दिले आहेत, तरीही नगर लोकसभा मतदारसंघावरून दोन्ही पक्षांत चांगलीच रस्सीखेच आहे. 

नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे इच्छुक आहेत. गेल्या वर्षापासून त्यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची जुनी विकास आघाडी त्यांच्या दिमतीला आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दक्षिणेला देण्याचा निर्णय असो, की नगर शहरात मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा; विखे यांचा अंतस्थ हेतू लपून राहिलेला नाही. 

नगर लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस आग्रही आहे, हे ओळखून तसेच राष्ट्रवादीतील काहींना ही जागा विखे यांना सोडावी, असे वाटत असल्याने राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर आपला हक्क आहे, असे सांगून आ. अरुण जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. जगताप-विखे यांचे सख्य फार जुने आहे. या मतदारसंघात आकडेवारीत तरी किमान कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी वरचढ आहे.

माजी आ. अनिल राठोड व खा. गांधी यांच्यातून सध्याही विस्तव जात नाही. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत शेलार यांच्या उमेदवारीवर शिवसेनेने शिक्कामोर्तब केले असून, त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेलार पूर्वी भाजपत होते. सूर्यभान वहाडणे पाटील यांच्या काळात त्यांची उमेदवारी लोकसभेसाठी जाहीर झाली होती; परंतु त्यानंतर पक्षाविरोधात उपोषणे व अन्य दबावामुळे शेलार यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. 

भाजप, राष्ट्रवादी व आता शिवसेना असा प्रवास झालेल्या शेलार यांना संघटनात्मक पदे मिळाली; परंतु त्यांना आतापर्यंत उमेदवारीने हुलकावणी दिली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने शेलार यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. ठाकरे स्वतः त्याबाबतची घोषणा नगरला 21 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात करणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.