नगर शहरात अर्भकाचा शिर नसलेला मृतदेह आढळला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील अमरधाम येथे मंगळवारी सकाळी अर्भकाचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला.अमरधाममधील कर्मचाऱ्यांनी तेथेच मृतदेह पुरला. याबाबत पोलिसांना माहिती न देता परस्पर मृतदेह जमिनीत पुरण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलिस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाबाबत चौकशी सुरू केली आहे. 


Loading...
मंगळवारी सकाळी दहा वाजता काही तरुण अमरधाम येथे आले होते. अमरधाममधील दशक्रिया विधी करणाऱ्या ओट्यापासून काही अंतरावर एक अर्भक पडल्याचे तरुणांनी पाहिले. या अर्भकाला शीर नव्हते. अर्भकाची नाळही तशीच होती. हा प्रकार तरुणांनी अमरधाममधील एका कर्मचाऱ्याला सांगितला. 

नागिरकांची गर्दी होऊ लागल्यामुळे अमरधाममधील कर्मचाऱ्यांनी एक खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरून टाकला. मृत अर्भकाचा प्रकार कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन गोकावे यांना समजल्यानंतर त्यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. 

अमरधाममध्ये मृत बालकांना पुरण्याची वेगळी व्यवस्था आहे. या ठिकाणी मोकाट कुत्री येऊन जमीन उकरून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. परंतु, शिर नसलेला मृतदेह सापडल्याने पोलिसांचा संशय बळवला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.