भिंगारचे प्रश्‍न केंद्र स्तरावर सोडविण्यासाठी शरद पवार यांना साकडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिक प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी दिले.


भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने वेळोवेळी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पाठपुरावा चालू आहे. मात्र हे प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुराव्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

विशाखापट्टणम महामार्ग क्रमांक 222 भिंगार शहरातून जात असताना प्रवाशांच्या सोयीसाठी भिंगार बस स्टॅण्ड पूर्ववत सुरू करावे. नागरिकांच्या सोयीसाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे मोकळ्या जागेत स्थलांतरित करावे. या हद्दीत भुरट्या चोर्‍या, धाडसी चोर्‍या, घरफोडी व वाहन चोर्‍या आदींचे प्रमाण वाढत असताना पोलीसांचे संख्याबळ वाढविण्यात यावे. 

भिंगारला होणारा पाणीपुरवठा एमआयडीसीमार्फत एम.इ.एस. व त्यांच्यामार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डाला होते. सदर पाणीपुरवठा औद्योगिक दराने नागरिकांना दिला जातो. तो घरगुती पाणी दरापेक्षा तीन ते चार पटीने अधिक असून, भिंगारसाठी स्वतंत्र पाणी योजना सुरु करावी. 

भिंगार विभागात चटई क्षेत्राचे बंधन असल्याने दुसरा मजला बांधता येत नाही. विभक्त कुटुंब पद्धती, वाढती लोकसंख्या विचारात घेऊन चटईक्षेत्र वन प्लस थ्री करणे बद्दल केंद्र सरकारकडे शिफारस करावी. केंद्र सरकारच्या योजना कॅन्टोन्मेंट बोर्डाला लागू कराव्यात. 

कॅन्टोमेंन्टच्या मोकळ्या जागेवर हडको मार्फत गृहनिर्माण योजना राबवावी. भुयारी गटार व झोपडपट्टी निर्मूलन योजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी विशेष लक्ष घालण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.