शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवीच ठरली !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिल्याचे हे सरकार सांगते, परंतु प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांचे माफ झाले हे मात्र सांगत नाही. शरद पवार हे केंद्रीय कृ षीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. या सरकारची कर्जमाफी ही फसवी असल्याचे स्पष्ट करत अकोले तालुक्यात अनेक डोंगराएवढी विकास कामे करून अकोल्याची नवी ओळख माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनीच निर्माण केल्याचे गौरवोद्गारही राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांनी अकोल्यात काढले.
Loading...

अकोले तालुक्यातील पिंपळगावखांड व पळसुंदे या धरणाच्या लोकार्पण व जलपूजनाच्या निमित्ताने अकोले तालुका दौऱ्यावर आलेले आ. पवार अकोले येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे होते. 


यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. वैभवराव पिचड, राष्ट्रवादी युवक प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, राज्य विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव नवले, राजुरच्या सरपंच सौ. हेमलता पिचड, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,कार्याध्यक्ष संदीप वर्पे, सेक्रेटरी सोमनाथ धूत, अजित कदम, जिल्हा युवकचे अध्यक्ष कपिल पवार, ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे, शिवाजीराव गाडे, दत्ता वारे, मिनानाथ पांडे, आबासाहेब थोरात, अरुण कडू, नगराध्यक्षा संगीता शेटे, गिरजाजी जाधव उपस्थित होते. 

पवार पुढे म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह, प्रणव मुखर्जी, पी. चिदम्बरम यासारख्या अर्थतज्ञांनी सत्तेत येताना कधीही चुकीची आश्वासने दिली नव्हती.मोदींनी मात्र सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख टाकू, स्विस बँकेतून काळा पैसा आणू अशा वारेमाप घोषणा केल्या. प्रत्यक्षात परदेशातून एक दमडीही आली नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हा 'चुनावी जुमला' असल्याचे बिनदिक्कतपणे सांगतात. 

राज्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिल्याचे हे सरकार सांगते परंतु प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांचे माफ झाले हे मात्र सांगत नाही. शरद पवार केंद्रीय कृ षीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मागील पाच महिन्यात १०९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता कुणावर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करायचा असा प्रश्न त्यांनीच मुख्यमंत्र्यांना केला. 

महाराष्ट्रात आज पेट्रोल व डिझेलचे दर देशात सर्वाधिक असून या सरकारने चार वर्षात बारा लाख कोटी रुपये तुमच्याआमच्या खिशातून काढले हे आपल्याला समजले देखील नाही. पण यावर लोक काही बोलत नाहीत. कुणीतरी बोलेल म्हणून शांत आहेत. 

यासाठीच आता १० सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पुरोगामी विचारवंताना संपविले जात आहे. हिटलरची हुकुमशाही देखील जनतेने मोडून काढली. सद्दाम हुसेनचा शेवटही कसा झाला हे जगाने पहिले आहे. मोदी सरकारने याचा विसर पडू देऊ नये,असे म्हणत त्यांनी मोदींना लक्ष केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.